भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर अनेक महान खेळाडूंनी आपले योगदान दिले आहे. यातील काही जणांची मैदानावरील खेळी ही चिरकाळ क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली. यामध्ये भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. बेदी यांनी भारतासाठी २२ सामन्यांत कर्णधारपद सांभाळले होते. क्रिकेटच्या रणसंग्रामात फिरकी हे भारताचे प्रमुख अस्त्र आहे, ही बाब बेदींनी जगाला पहिल्यांदा दाखवून दिली. बेदी यांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या साथीने जगाला आपल्या फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले होते. डावखु-या गोलंदाजीची फिरकी गोलंदाजी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ हा बेदी यांनी दाखवून दिला होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा दबदबा होता.
भारतात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि विख्यात डावखुरे फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे. अर्थात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी भारतीय चाहते अणि क्रिकेट जग त्यांच्या फिरकीला, त्यांच्या धाडसी निर्णयाला आणि परखड मतांना विसरलेले नाही.
माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबच्या अमृतसर शहरात झाला. बेदी यांनी तब्बल बारा वर्षे भारतीय संघाच्या फिरकीची कमान सांभाळली. त्यांचे कसोटीतील पदार्पण ३१ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डनवर झाले आणि ते १९७९ पर्यंत भारतीय संघाचे सदस्य राहिले. प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये बेदी यांच्या नावावर १५६० विकेट नोंदलेल्या आहेत. बेदी यांनी वयाच्या १५व्या वर्षी उत्तर पंजाबकडून रणजी ट्रॉफीतून पदार्पण केले आणि नंतर ते दिल्लीकडून खेळले. ते फलंदाज टिपण्यात माहीर होते. त्यामुळे त्यांचा कोणताही चेंडू निष्फळ जात नव्हता. नॉर्थम्प्टनशरमध्ये त्यांनी कौंटी क्रिकेटमध्ये चांगले यश मिळवले होते.
बेदी यांच्या फिरकीबरोबरच त्यांची स्पष्ट मते नेहमीच चर्चेत राहिलेली आहेत. अलिकडच्या काळात ते कमी मत मांडत असत. असे असतानाही गोलंदाजीशी संबंधित कोणतीही चर्चा किंवा कोणताही संदर्भ हा बेदी यांना वगळून होत नाही, हे देखील तितकेच खरे. भारतीय मैदानावर आज वेगवान गोलंदाजांचा जलवा अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुण पिढीला कदाचित फिरकी गोलंदाजी हे भारतीय संघाचे बलस्थान होते आणि तीच खरी शक्ती होती, यावर विश्वास बसणार नाही.
फिरकी युगाचे नेतृत्व बेदी यांनी केले. ईरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर यांच्यासह बेदी यांनी १९७० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाच्या जगप्रसिद्ध तिकडीने राज्य केले. त्यात वेंकट राघवन यांचा समावेश झाल्यानंतर चौकडी म्हणून नावारूपास आली. प्रत्येक गोलंदाजाचे वेगळे वैशिष्ट्य आणि शैली होती. प्रसन्ना यांनी टाकलेला चेंडू हा फलंदाजाला चकवायचा आणि यष्टिरक्षकाच्या हाती झेल सोपविण्यास भाग पाडायचा. चंद्रशेखर यांचा वेगवान लेग ब्रेक गुगलीने अनेकांची भंबेरी उडायची. त्यांचा प्रत्येक चेंडू हा गूढ असायचा. बेदी यांचा उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला स्तब्ध करायचा. १९६६ ते १९७८ या काळात फिरकींची ही चौकटी भारतीय गोलंदाजांचा कणा होता. एवढेच नाही तर बेदी यांनी फिरकी गोलंदाजीचे पावित्र्य आणि सातत्य जपण्यावर भर दिला.
अनेक तास एक प्रकारची आणि शैलीची गोलंदाजी करताना बेदी यांना पाहणे हे एखाद्या कलाकाराकडे पाहण्यासारखे होते. सुनील गावसकर यांनी आपल्या पुस्तकात म्हटले, की बेदी केवळ लांब पल्ल्यांपर्यंत चेंडू टाकत नव्हते तर सतत फटके बसत असतानाही उसळी घेणारे चेंडू टाकण्यात ते मागेपुढे पाहत नव्हते. फिरकी गोलंदाजीचा हा कलाकार आपल्या नेतृत्वाखाली धाडसी निर्णय घेण्यापासूनही कधी हटला नाही. मग पाकिस्तानच्या संघाने रडीचा डाव खेळल्यानंतर फलंदाजांना माघारी बोलावण्याचा निर्णय असो किंवा इंग्लंडचा गोलंदाज जॉन लिव्हरने भारतीय दौ-यात व्हॅसलिन लावून केलेल्या गोलंदाजीला विरोध असो. त्याचबरोबर अलिकडच्या काळात दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात अरुण जेटली यांची प्रतिमा लावण्याला विरोध केलेला असो. भारतीय फिरकी गोलंदाजीची चांगली फळी तयार करण्याचे काम असो किंवा कर्णधार आणि प्रशिक्षकाची भूमिका असो, बेदी यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. बिशनसिंग बेदी हे सचिन तेंडुलकरला आपल्या मुलासारखे मानत असत. बेदी यांचे पुस्तक ‘सरदार ऑफ स्पिन’ बाबत तेंडुलकर यांनी म्हटले, बेदी १९९० च्या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक होते आणि ते सरावादरम्यान कडक असायचे. त्यानंतर ते मला मुलासारखे वागवत असत. ‘सरदार ऑफ स्पिन’ हे पुस्तक बिशन सिंग यांची कन्या नेहा बेदी यांनी लिहिले आहे.
विश्वचषकात एकाच सामन्यात आठ षटकं निर्धाव
बिशन सिंग बेदी यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामने खेळले आणि यादरम्यान त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. बेदी यांनी २२ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. यात टीम इंडियाला सहा सामन्यांत विजय मिळाला तर ११ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. पाच कसोटी सामने अनिर्णीत राहिले. एकदिवसीय सामन्याचा विचार केला तर चार सामन्यांचे नेतृत्व त्यांनी केले आणि त्यात एका सामन्यात विजय मिळाला तर तीन सामन्यांत संघाला पराभूत व्हावे लागले. १९७५ च्या विश्वचषकात भारताकडून त्यांनी दोन सामने खेळले. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यात त्यांनी ईस्ट आफ्रिका अणि न्यूझिलंडविरुद्धचे सामने खेळले आणि या दोन्ही सामन्यांत त्यांनी एक-एक विकेट घेतली. ईस्ट आफ्रिकेविरुद्ध बेदी यांनी १२ षटकांपैकी ८ षटके निर्धाव टाकली अणि सहाच धावा दिल्या. बेदी यांचा हा पहिला आणि शेवटचा विश्वचषक होता. ३० ऑगस्ट १९७९ रोजी बेदी यांनी ब्रिटनविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला.
– नितीन कुलकर्णी