कडा : पिंपरी चिंचवड येथील महिला आष्टी येथील पाहुण्याकडे कार्यक्रमा निमित्त येत असताना नगर ते आष्टी बसमध्ये प्रवास करत होती. प्रवासादरम्यान, पर्समध्ये ठेवलेले अडीज तोळे सोन्याचे दागिने जवळ बसलेल्या प्रवाशी महिलेने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरातील नाजिया खमार कुरेशी या रविवारी आष्टी येथे पाहुण्याकडे कार्यक्रम असल्याने खाजगी वाहनाने अहमदनगरपर्यंत आल्या. त्यानंतर अहमदनगर ते आष्टी बसमध्ये पुढील प्रवासासाठी बसल्या. प्रवास करत असताना धानोरा येथून काही महिला बसमध्ये बसल्या. कडा बसस्थानकात बस येताच सदरील महिला उतरल्या. मात्र, त्याच दरम्यान नाजिया खमार कुरेशी यांनी पर्स पाहिली असता आतमध्ये ठेवलेले अडीज तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले.
माहिती मिळताच कडा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक हनुमंत बांगर, मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे, सचिन गायकवाड, महेश जाधव यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासत परिसरात शोध घेतला. पण कोणी मिळुन आले नाही.रविवारी सायंकाळच्या दरम्यान नाजिया खमार कुरेशी रा.पिंपरी चिंचवड पुणे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार आजिनाथ काकडे करीत आहेत.