31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रयामिनी जाधव यांना हवी मनसेची साथ

यामिनी जाधव यांना हवी मनसेची साथ

राज ठाकरेंची घेतली भेट, दक्षिण मुंबईत प्रचाराचा धडाका

मुंबई : प्रतिनिधी
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन गटाच्या शिवसैनिकांतच लढत रंगणार आहे. एकीकडे महायुतीची शक्ती एकवटलेली असताना अरविंद सावंत यांना त्यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. एकीकडे अरविंद सावंत यांचा जनसंपर्क आणि एक तगडा नेता म्हणून प्रतिमा असलेल्या नेत्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी शिंदे गटाला भाजप आणि मनसेचीही साथ हवी आहे. त्यामुळे यामिनी जाधव यांनी थेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मदतीची विनंती केली आहे.

दक्षिण मुंबईत शिंदे गट, भाजप आणि मनसेची ताकद मोठी आहे. या माध्यमातून अरविंद सावंत यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यातील अखेरच्या टप्प्यात या मतदारसंघात महायुतीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते. सध्या या मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईत राज ठाकरेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उपनेते यशवंत जाधव उपस्थित होते. मनसेचे बाळा नांदगावकर यानी याच मतदारसंघात असलेल्या शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढलेली आहे. त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो.

दक्षिण मुंबईत मनसेची मोठी ताकद असून राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात मराठी मतदार अधिक आहेत. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेने मोठा विजय मिळवला होता. दोन्ही वेळा शिवसेनेचे अरविंद सावंत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याचे समजते. त्यामुळे बरेच दिवस येथून कोणाला उतरवायचे, याची चाचपणी सुरू होती. परंतु विचारमंथन करून महायुतीत शिंदे गटाने मुंबई मनपाचे माजी सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांना मैदानात उतरविले आहे.

शिवसेनेतील फुटीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वच समीकरणे पुरती बदलली आहेत. अशातच ठाकरेंचा बालेकिल्ला आणि मराठीबहुल असलेल्या दक्षिण मुंबईतून दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ठाकरेंनी अरविद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली. मात्र, महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दक्षिण मुंबईतून दोन शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज होणार आहे.

…म्हणून राज ठाकरे मैदानात
दक्षिण मुंबईतील ठाकरेंची लाट मोडीत काढण्यासाठी महायुतीने दुस-या ठाकरेंना मैदानात उतरवण्याचा घाट घातल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. याच पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR