छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी दहा रुपयांत दहा नग मिळणा-या लिंबांना आता मोठी मागणी मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. शहरातील बाजारपेठेत वीस रुपयांना तीन याप्रमाणे विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयांना दोन लिंबू मिळत आहेत. एप्रिल महिन्यानंतर दिवसेंदिवस लिंबाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
यंदा अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका खरीप पिकांसह भाजीपाल्यावर झाल्याने कही दिवस दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली होती. लिंबू पिकावरही याचा प्ररिणाम झाला आहे. दिवसेंदिवस शहर व परिसरात उन्हाचा चटका वाढल्याने रसवंती, लिंबू सरबत, लिंबूसोडा यासह विविध दुकाने थाटण्यात येत आहेत. परिणामी लिंबाची मागणी वाढल्याने या आठवड्यात भाव तेजीत आले आहेत. सध्या लिंबाचे दर १५० ते १७० रुपये प्रतिकिलो आहेत. मे महिन्यात लिंबाचे दर अडीचशे ते ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तविली आहे.
रमजानमध्ये वाढणार भाव
यंदा मार्च महिन्यापासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान माह सुरू असल्याने सायंकाळी रोजा (उपवास) सोडताना लिंबाचा रस जास्त विक्री होईल. यामुळे यंदा लिंबाचे भाव ३०० रुपयांचा आकडा पार करतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
हैदराबादहून लिंबांची प्रतीक्षा
उन्हाळ्यात हैदराबादहून लिंबू शहरात विक्रीला येतात. या लिंबांमुळे स्थानिक लिंबांचे भाव थोडे कमी होतात.