मास लेव्हलवर फुटला पेपर, तक्रारदाराचा गंभीर आरोप
आरोपी ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये कारवाई
नंदुरबार : प्रतिनिधी
एमपीएससी पेपरफुटीचे प्रकरण अतिशय गंभीर असून, हा पेपर मास लेव्हलवर फुटला असून, एमपीएससीचा वरिष्ठ अधिकारी लेंडवे हाच मास्टरमाईंड आहे. परंतु या पेपरफुटीला प्रेमाचा अँगल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने केला. दरम्यान, पहिला तक्रारदार गौरव पाटीलला अटक केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा नंदूरबारकडे वळवत या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटीलला मुंबई पोलिसांच्या पथकाने नंदुरबारमधून ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशीनंतर अटकही केली. या पेपरफुटीची व्याप्ती मोठी असल्याचे गांगुर्डेचे म्हणणे आहे.
एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात प्रेमाचा अँगल समोर आला होता. तक्रारदार गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या प्रेम प्रकरणातून हा पेपर फुटल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हे प्रकरण दाबण्यासाठी तसा अँगल दाखविला जात असल्याचा आरोप दुसरा तक्रारद्रार ऋषिकेश गांगुर्डे याने केला. या प्रकरणात पहिला तक्रारदार गौरव पाटीलला अटक केली. त्यानंतर आता ऋतुजा पाटीललाही अटक झाली.
ऋतुजा पाटील यांना त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांचे पथक आज सकाळीच नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. या पथकाकडून नंदुरबारमधील विविध ठिकाणी झाडाझडती आणि चौकशी केली आणि त्यानंतर अखेर ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली. ऋतुजा पाटील यांना मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून नंदुरबारहून मुंबईला नेण्यात आले. ऋतुजा पाटील यांच्या अटकेमुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. यापूर्वी, पोलिसांनी प्रवीण पाटीलला अटक केली होती.
पेपरफुटीचा प्रकार अत्यंत गंभीर असल्यानेच अन्न, औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई केली. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या ३ अधिका-यांसह ६ जणांना अटक केली. यामध्ये एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांचा समावेश आहे.
अधिकारी लेंडवे
हाच मास्टरमाईंड!
पोलिसांनी चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रकार केला आहे. जो गौरव पाटील पेपरफुटी प्रकरणात माझ्यासोबत तक्रार द्यायला होता, तो कसा काय आरोपी असू शकेल? तो आणि मी तुकाराम मुंढे यांना भेटून तक्रार दिली आणि त्यानंतर एमपीएससी आयोगात येऊन लेंडवे नावाच्या अधिका-याला भेटलो. तो पेपरफुटीचा मास्टरमाईंड आहे, असा आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने केला.
नकाते नावाच्या अधिका-याने
पुतण्यासाठी फोडला पेपर!
ज्या नकाते नावाच्या अधिका-याला अटक झाली, त्याने आपल्या पुतण्यासाठी फोडला. त्यानंतर ज्याने पेपर ५० लाख रुपयाना खरेदी केला, त्याने पुढे आपले पैसे रिकव्हर करायला १०-१० लाख रुपयाला विकला आणि तिथून पुढे मास लेव्हलला ही पेपरफुटी झाली. याची व्याप्ती सातारा बीड, सोलापूर जिल्ह्यापर्यंत आहे. हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत, असा गंभीर आरोपही ऋषिकेश गांगुर्डेनी केला.
एमपीएससीचा भोंगळ
कारभार अद्याप सुरूच
पेपरफुटीमुळे चर्चेत आलेल्या एमपीएससीचा गोंधळ सुरूच असून राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेतही घोळ असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही विद्यार्थ्यांना २५० पैकी २, ६ आणि ११, १४ असे गुण मिळाले तर काही विद्यार्थी हे मराठी या क्वॉलिफाईंग पेपरमध्ये नापास झाले. गुणांची तफावत लक्षात घेता हे पेपर्स तपासताना पारदर्शकता ठेवण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यूपीएससीच्या धर्तीवर प्रथमच लेखी परीक्षा घेण्यात आली. आता गुण जाहीर होताच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
















