30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रकर्नाटकच्या बसवर भगवा फडकवला

कर्नाटकच्या बसवर भगवा फडकवला

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटणार; कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक

कोल्हापूर : प्रतिनिधी
एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने सांगलीतून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे आता कन्नडीगांचा उन्माद सुरू झाला आहे. कन्नडीगांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाच्या तोंडाला काळे फासत बसचीही तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे आता सीमावर्ती भागात याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली असून कोल्हापूर शहरात याचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कन्नडीगांनी फोडली. तसेच चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असे म्हणत त्याच्या तोंडाला काळे फासले. यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणावरून कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी (ता. २१) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केली. यामध्ये कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.

याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून डरकाळी फोडण्यात आली असून आज शनिवार (ता.२२) झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकवला.

बसचालकाच्या तोंडाला काळे फासले
कन्नडीगांचा उन्माद वाढत असून या ना त्या कारणावरून कानडी सतत महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढत असतात. आता बसचालकावर हात टाकत त्याच्या तोंडाला काळे फासले आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR