मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला असून बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आता आर्थिक सहाय्य मिळणार आहे. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या विभागाकडून या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती आहे.
बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला ६ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तर दिव्यांग झाल्यावर कामगारांना २ लाख रुपयांचे सहाय्य मिळणार असल्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
दरम्यान, या विषयी बोलताना राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, बांधकाम कामगार हा समाजातील अंतिम घटक आहे. अपघात झाला तर त्या घराला आधार दिला पाहिजे. म्हणून नैसर्गिक मृत्यूसाठी मदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक मृत्यूसाठी साडेतीन लाख, अपघाती मृत्यूसाठी साडेसहा लाख, अपंगत्व आले तर २ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निवृत्तीनंतर वेतन देण्याचा निर्णय घेत आहोत. तसेच महिलांना मॅटर्निटी लाभ देण्यात येईल. जे बांधकाम कामगार मंडळात नोंद आहेत त्यांना हा लाभ दिला जाईल. तर नोंदणी करताना ग्रामसेवक पत्र लागायचे, ग्रामसेवकांनी नकार दिल्याने कंत्राटदारांना द्यायला सांगितले. तसेच तहसीलदार व इतर यंत्रणांच्या मदतीने हे प्रमाणपत्र देत आहोत, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक ‘कामगार हित’ जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी बैठकीत सहभाग घेतला.
















