महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली. या बैठकीत डीए आणि डीआरमध्ये ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो १ जुलै २०२४ पासून लागू असेल. यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला लाभ होणार आहे. केंद्राच्या सेवेत ४९ लाख कर्मचारी आहेत तर ६० लाख निवृत्तीवेतनधारक आहेत.
केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचा-यांना महागाई भत्ता दिला जातो तर निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा भत्ता दिला जातो. सर्वसाधारणपणे डीए आणि डीआर वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ करण्यात येते. केंद्राच्या सेवेतील लाखो कर्मचा-यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना ५० टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मार्च महिन्यात केंद्राने ४ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. २००६ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय सेवेतील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिल्या जाणा-या महागाई भत्त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये सुधारणा केली होती.