छ. संभाजीनगरमध्ये सीजेपीची घोषणा
६० टक्के तरुणांचे
प्रश्न केंद्रस्थानी आणू
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडत सरकारला नमवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आता आपल्या आगामी देशव्यापी रणनीतीची घोषणा केली. आमचा लढा केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सीजेपी देशभरात क्या बोलती पब्लिक, ही विशेष मोहीम राबवून देशातील ६० टक्के तरुणांचे प्रश्न थेट केंद्रस्थानी आणणार आहे, अशी घोषणा सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केली.
कॉकरोच जनता पार्टीच्या २ दिवसीय राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीचा समारोप आज पार पडला. त्यानंतर पुढील आंदोलनाची आणि संघटनात्मक बांधणीची आखणी करताना सीजेपीने जॉईन द मुव्हमेंट, जॉईन सीजेपी हे नवे अभियान लॉन्च केले. सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत क्यूआर कोड जारी करत देशातील जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आम्ही राजकीय पक्ष काढणार नसून, सरकारवर व राजकीय पक्षांवर सतत दबाव आणणारा पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर महिन्यात क्या बोलती पब्लिक मोहिमेत सीजेपीची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी…या शिक्षण धंद्याविरोधात आणि बेरोजगारीविरोधात सीजेपी आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल, असा थेट इशारा अभिजीत दिपके यांनी दिला.
आता ५ झोनमध्ये
देशव्यापी संघटन
सीजेपीच्या नव्या रणनीतीनुसार संपूर्ण देशाची ५ मुख्य भागांत विभागणी करून संघटन बांधणी केली जाणार आहे. आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्ना सिंग यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी असेल तर वैष्णवी गौर या धोरणात्मक निर्णय निश्चित करतील.
जनतेच्या सहभागातून
निधी गोळा करणार
आंदोलनासाठी लागणारा निधी हा कुठल्या बड्या राजकीय पक्षाकडून किंवा उद्योजकाकडून न घेता जनतेच्या सहभागातून गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीजेपीने घेतला.
















