लातूर : प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती बसस्थानक जवळ दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरुन अज्ञात व्यक्तींनी काही तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुस-या तरुणावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. सदरच्या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणी शोएब सलाआऊद्यीन शेख रा. कातपूर रोड, लातूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व गांधी चौक पोलीस ठाणेचे पथके तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पथकांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून अवघ्या काही तासातच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपाल उर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड, वय ३३ वर्ष, राहणार विक्रमनगर, लातूर. अजय सोमनाथ घोडके, वय २७ वर्ष, राहणार जुनी लेबर कॉलनी, लातूर, प्रवीण बाबुराव कांबळे, वय ४० वर्ष, सावित्रीबाई फुलेनगर नांदेड सध्या राहणार एलआयसी कॉलनी लातूर अशी असून वरिष्ठांचे व गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. क-हे हे पुढील तपास करीत आहेत.