ग्रीक तत्त्वज्ञानात म्हटले आहे की, ‘‘ग्रंथालय ही आमची औषधालये आहेत’’ हा विचार अगदीच खरा आहे. माणसांची मने निर्मळ ठेवण्याचे काम तर पुस्तकेच करत असतात. पुस्तकाच्या वाचनातून आनंद मिळत असतो. पुस्तकांनी जीवनातील व्देष, मत्सर, राग कमी होत जातो. निर्मळता उंचावत जाते. माणसांच्या जीवनाचे मोल लक्षात आणून देण्यास मदत करते. मन निर्मळ झाली की, मन आणि शरीरावरील ताण तणाव कमी होत जातो. आज हाती असलेल्या मोबाईल ऐवजी पुस्तक हाती आले तर बालकांच्या आयुष्यातील आणि पालकांच्या चिंतेची अनेक प्रश्न निकाली निघतील यात शंका नाही. गरज पुस्तकांचे बोट धरण्याचे.
वाचन माणसांच्या आयुष्यात काय करू शकते? याचे प्रतिबिंब कलामांच्या समग्र आयुष्यात प्रतिबिंबीत झालेले अनुभवास येते. पुस्तकांनी मस्तके घडवली तर माणसं किती निरपेक्षतेने जगू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कलाम. जीवनभर पुस्तकांसोबत जगताना स्वत:ची विवेक वाट चालण्याचा निर्धार वर्तमानात सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे.हाती पुस्तके आली की, माणसांचे जीवन बदलू शकते यावर जगातील विचारवंतांचा विश्वास आहे. अनेकांना ती वाट सापडली. ज्यांच्या हाती पुस्तके दिसतील त्यांची मस्तके अधिक उत्तमतेने घडली जातात. जो समाज पुस्तकांच्या सोबतीने चालतो ते राष्ट्र अधिक प्रगतीच्या दिशेने प्रवास करते. आज पुस्तके हाती देणारे पालक हरवले आहेत. बालकांच्या आयुष्यातून पुस्तके हरवली आहेत त्यामुळे माणसांची उंची हरवत चालली आहे. जेथे माणसांची उंची कमी होत जाते तेथे समाजाची उंची तरी कशी वाढणार? आपल्याला आपला भोवताली जेव्हा भकास वाटू लागते तेव्हा त्याचे कारण असते रिकामी मस्तके. रिकाम्या मस्तकांच्या माणसांच्या समूहाला समाज तरी कसे म्हणायचे? अशा माणसांचा समूह म्हणजे केवळ गर्दी असते त्यामुळे आपल्याला समृद्ध समाज हवा असेल तर आजच मुलांच्या हाती उत्तम खेळणी, वस्त्र, मोबाईल, संगणक देण्याबरोबर चांगली पुस्तके देण्यासाठी पालकांनी आग्रही असायला हवे. पुस्तके वाचनाने कदाचित मुलांचे मार्क कमी होतील; पण मुलांच्या ‘गुणांचे’ मात्र संवर्धन झालेले आपणास अनुभवास येईल. माणसाला माणूस म्हणून घडविणे हेच खरे शिक्षण असते. ते पुस्तकांच्या शिवाय पुढे जाणे शक्य नाही.
जगाच्या पाठीवर ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहेत अशा अनेक महापुरूषांच्या आयुष्यातील परिवर्तन पुस्तकांनी केले आहे. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यासारख्या अनेकांचे आयुष्य हे केवळ पुस्तकांनी बदलवले आहे. हे त्यांनी आपल्या जीवन चरित्रात अभिमानाने नोंदवले आहे. अॅरिस्टॉटल यांनी म्हटले होते की, ‘माझ्या आयुष्यातील माझ्या फक्त तीनच गरजा आहेत. त्या म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं’. हे पुस्तकाचे मोल आहे. त्यांना पुस्तकांमुळे जीवनाची वाट सापडली ती वाट आपल्याही पाल्याला सापडू शकते. पालकांनी मुलांमध्ये गुण कशी रूजतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज पालक मुलांना गुण नसले तरी चालतील मात्र मार्कासाठी आग्रही भूमिका घेऊन आहेत. मार्क मिळवण्याच्या नादात आपण मुलांच्या भविष्याकडेच दुर्लक्ष करत आहोत हे लक्षात घेणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. पुस्तके केवळ माहिती देत नाही तर जीवनाची प्रकाशमय वाट दाखवत असतात. ग्रीक तत्त्वज्ञानात म्हटले आहे की, ‘‘ग्रंथालय ही आमची औषधालये आहेत’’ हा विचार अगदीच खरा आहे.
माणसांची मने निर्मळ ठेवण्याचे काम तर पुस्तकेच करत असतात. पुस्तकाच्या वाचनातून आनंद मिळत असतो. पुस्तकांनी जीवनातील व्देष, मत्सर, राग कमी होत जातो. निर्मळता उंचावत जाते. माणसांच्या जीवनाचे मोल लक्षात आणून देण्यास मदत करते. मन निर्मळ झाली की, मन आणि शरीरावरील ताण तणाव कमी होत जातो. पुस्तकांमुळे शरीर मनही प्रसन्न राहाते. आजारपणापासून शरीर आपोआप दूर जाते. त्या अर्थाने माणसांच्या निराशेच्या छायेला पुस्तक हे मोठे औषध आहे. पाश्चात्य देशात अगदी कमी कायदे आहे. राज्यघटना अत्यंत कमी कलमांची आहे. काही नियम तर अलिखित आहे तरी तेथे लोक नियम पाळतात. गुन्हेगारी कमी आहे. याचे कारण तेथीला लोकमाणसावर शहाणपणाचा प्रभाव आहे. पुस्तकांमुळे तेथील लोकांनी मने घडली आहेत त्यामुळे स्वहितापेक्षा समाज व राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे मानले जाते. शब्दसंपत्ती ही तर वाचनाने प्राप्त होते. वादविवादाची शक्ती मिळेल; पण केव्हा वाद घालायचा आणि केव्हा संवाद करायचा याचा विवेक वाचनातून विकसित होतो. त्या अर्थाने विवेक व शहाणपण वाचनातून मिळत असेल तर तेच पूर्णत्व आहे.
वाचनातून माणसांच्या जीवनाला आकार मिळण्यास सुरुवात होत असते. वाचनाने दृष्टीकोन निर्माण होतो. व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम वाचनामुळे घडते. त्याच वेळी लेखन कौशल्यांचा विचारही त्यातून गतिमान होतो. वाचन असल्याशिवाय लेखनाचा समग्र प्रवास घडत नाही त्यामुळे लेखनाचा विचार पुढे न्यायचा असेल तर पुस्तक वाचनाला पर्याय नाही. लेखन हे भाषेचे सर्वात शेवटचे कौशल्य आहे. ते सहजसाध्य नाही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रवास अधिक उत्तम घडावा असे वाटत असले तर वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचे मोल सांगताना एचमॅन म्हणतात की, ‘‘पुस्तके नसलेले घर म्हणजे खिडक्या नसलेली खोली आहे. ज्या घराला खिडकी नाही तेथे प्राणवायू कसा येणार? प्राणवायू नाही म्हणजे जगणे तरी कसे होणार ? त्यामुळे खिडकी म्हणजे प्राणवायूचे व्दार आहे’’. आपल्याभोवती लाखो रुपये गुंतवणूक करत महालांची निर्मिती केली जाते. त्या महालात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत मात्र पुस्तकासाठीची खोली तर सोडा एखादे कपाटही आस्तित्वात नाही. हे सारे महाल म्हणजे अंधा-या खोल्याच आहेत. अंधारात वाट सापडत नाही. जीवनातही आपल्या हाती पुस्तके नसतील तर जीवनात वाट सापडत नाही. निर्णय घेता येत नाही. मनात व्दंद निर्माण होते त्यामुळे पुस्तकांशिवाय जीवन म्हणजे जीवनाला अंधकारात लोटणे आहे. घर म्हणजे केवळ भिंती नाहीत तर तेथे पुस्तकांचे आस्तित्व अधिक महत्त्वाचे आहे.
आपण मुलांचे संगोपन करताना त्यासाठी मोठा खर्च करत असतो. त्याच्यासाठी शाळा निवडताना स्मार्ट स्कूलची निवड करतो. उत्तम इमारत आपल्याला हव्या असतात. उत्तम वातावरण हवे असते. संगणक माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा हव्यात. त्यासाठी लाखो रुपये मोजले जातात; पण त्या शाळेत समृद्ध ग्रंथालय आहेत का? याचा विचार केला जात नाही. मुलाला चांगल्या शाळा हव्या आहेत याचा अर्थ त्या शाळेत ग्रंथालयाची सुविधा किती प्रभावी आणि परिणामकारक उपयोगात आणली जाते हे अधिक महत्त्वाचे आहे. शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालयाचे स्थान हरवत चालले आहेत. आज घरात बालकाला हव्या त्या सुविधा पुरवल्या म्हणजे त्याची गरज पूर्ण झाली असे नाही. त्याची पुस्तकांची गरज जाणून घेणार की नाही ? हाती पुस्तके दिली तर पुन्हा आयुष्यात वेगळ्या संस्कार वर्गांच्या वाटा धुंडाळण्याची गरज पडणार नाही. शिकवणी लावण्याची गरज नाही. बालवयातच पुस्तके हाती देण्याची गरज आहे. वयाच्या ११ वर्षाच्या आत मुलांच्या हाती पुस्तके आली तर वाचनाची संस्कार टिकतो असे मानले जाते. भविष्यातील धोक्यांवर मात करण्यासाठी आजच मुलांच्या हाती पुस्तके देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
पालकांनी मुलांबाळांचे संगोपन करताना अन्न, पाण्याबरोबर मुलांची पुस्तकांची गरज भागवायला हवी. मुलांना अन्नाची गरज असते त्याप्रमाणे त्यांना पुस्तके वाचनाचीदेखील भूक असते. पुस्तकाशिवाय घर म्हणजे कुटुंबावर केलेला अन्यायच आहे. अवतीभोवती पुस्तके असली की, पुस्तक वाचनाची गोडी आपोआप लागते. घरातील मंडळी एकत्रित बसून दूरदर्शन संच पाहतात त्याप्रमाणे बालकही दूरदर्शन संच पाहणे पसंत करते. घरातील माठ्यांनी घरात रोज किमान एक तास पुस्तक वाचनाचा प्रयत्न केला तर मुलेही पुस्तके वाचताना दिसतील.
शिक्षण शास्त्राच्या सिद्धांतानुसार मुले ऐकून कमी शिकतात आणि पाहून अधिक शिकतात. आज घरात पुस्तके वाचणारी माणसं हरवत चालली आहेत म्हणून मुलांना वाचनाची गोडी नाही. शिक्षकही पुस्तके वाचतील तर भविष्यात विद्यार्थी पुस्तक वाचनाची वाट चालू लागतील. वाचनातूनच ज्ञानार्जनाची रुची उत्पन्न निर्माण होते त्यामुळे तरुणमने विद्याविनय संपन्न बनतात. तरुणांच्या मनात विद्या अभिरूचीचा विचार रूजला की मग तरुणांची मने व्यसने, विकार, विलासासारख्या फालतू नशेत रमत नाहीत. एका अर्थाने पुस्तके ही अधोगतीला घातलेला अडसर आहे. आज आपण मुले वाममार्गाला जाताना पाहतो त्यापासून परावृत्त होण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातात; मात्र ते सारे प्रयत्न पुरेसे ठरत नाही. काय करावं आणि काय करू नये हे कळण्यासाठी विवेकाची व शहाणपणाची गरज असते. तो विवेक वाचनातूनच विकसित होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे पुस्तके हाती दिली गेली तर बालकांचे आयुष्यदेखील परिवर्तनाची वाट चालेल. समाजातील जो भ्रष्टाचार आहे तो वाचन संस्काराने कमी होईल. पैसा हे जीवनाचे सर्वस्व नाही. पैशापेक्षा माणसं अधिक महत्त्वाची आहेत. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, हे एकदा लक्षात यायला हवे.
-संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
















