साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण संपूर्ण देशभरात अतीव उत्साहाने साजरा होतो. अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि तमोगुणावर सत्त्वगुणाचा अंतिम विजय अधोरेखित करणा-या या सणाला लोकपरंपरा, संस्कृती आणि पौराणिकतेचे मौलिक संदर्भ आहेत. आजच्या आधुनिक आणि गतिमान यगात विजयादशमीचे महत्त्व अधिकच प्रस्तुत ठरते. रणांगणांवरील युद्धांबरोबरच मानवी मनात आणि सामाजिक पटलावर विचारांचे, स्वार्थाचे आणि संकुचिततेचे संघर्ष सतत सुरू असतात. स्वत:मधील दुर्गुण, आळस, निराशा आणि अन्यायाची वृत्ती या रावणरुपी अनिष्टांचे दहन करून ज्ञानाची, श्रमाची आणि मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हेच खरे आधुनिक सीमोल्लंघन आहे. नवे उद्योग, नवीन संकल्प, शिक्षणाचा श्रीगणेशा आणि नवविचारांची पेरणी करणे हाच दस-याचा विजयसंदेश आहे. रतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे स्वरूप रूढी आणि परंपरांबरोबरच मानवी मूल्ये, सामाजिक एकात्मता आणि अध्यात्माचा समृद्ध संगम घडवून आणणारे आहे. या सांस्कृतिक परंपरेत आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसरा अथवा विजयादशमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जाणारा हा दिवस भारतीय जनमाणसात अपार उत्साह, नवी आशा आणि पराक्रमाची चेतना जागवणारा ठरतो. पावसाळ्याची सांगता होऊन भवताली शरद ऋतूचे प्रसन्न वातावरण असताना साजरा होणारा हा सण अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि तमोगुणावर सत्त्वगुणाचा अंतिम विजय अधोरेखित करतो.
विजयादशमीला पुराणांतील आणि महाकाव्यांतील कथांचे संदर्भ आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकापती रावणाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली तो हाच दिवस मानला जातो. घनघोर युद्धानंतर रावणाचा झालेला पराभव हा व्यक्तीमधील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंच्या विनाशाचे प्रतीक आहे. उत्तर भारतात या निमित्ताने रंगणारा रामलीलेचा भव्य नाट्योत्सव आणि त्यानंतर होणारे रावणदहन समाजाला अनितीविरुद्ध उभे राहण्याचे शाश्वत नैतिक मूल्य शिकवते. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच युनेस्कोने भारतातील या रामलीला परंपरेची दखल घेत तिचा जागतिक अमूर्त वारशात समावेश केला आहे. यावरून या परंपरेचे सार्वकालिक महत्त्व सिद्ध होते. महाभारतातील संदर्भही दस-याच्या दिवशी एका वेगळ्या संकल्पाची आणि सिद्धतेची साक्ष देतात. अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी आपली दिव्य अस्त्रे आणि शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी याच दिवशी शमीची पूजा करून आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली आणि कौरवांविरुद्धच्या धर्मयुद्धासाठी सिद्धता दर्शवली त्यामुळेच विजयादशमी हा दिवस निष्क्रियतेचा त्याग करून स्वत:मधील सुप्त शक्तींना जागे करण्याचा आणि कर्तव्याच्या सीमोल्लंघनाचा दिवस ठरतो. पूर्वीच्या कामात अनेक राजे सीमोल्लंघनाची प्रथा याच दिवशी पाळत असत. राज्याच्या सीमा ओलांडून पराक्रमाची नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचा हा ऐतिहासिक वारसा आजही आदराने जपला जातो.
पुराणकथांमधील आणखी एक अत्यंत प्रभावशाली संदर्भ म्हणजे महिषासुरमर्दिनी दुर्गेचा विजय. मार्कंडेय पुराणातील वर्णनानुसार, तिन्ही लोकांत हाहा:कार माजवणा-या महिषासुर या दैत्याचा संहार करण्यासाठी आदिशक्ती दुर्गा अवतरली. नऊ रात्री आणि नऊ दिवस चाललेल्या प्रखर संघर्षानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. बंगाल, आसाम आणि संपूर्ण पूर्व भारतात हा दिवस दुर्गोत्सवाची सांगता म्हणून विजयादशमीच्या रुपात अत्यंत मांगलिक वातावरणात साजरा होतो. नऊ दिवसांच्या आदरातिथ्यानंतर गंगेच्या पात्रात किंवा जलाशयांमध्ये देवीच्या मूर्तींचे होणारे विसर्जन हे सृष्टीच्या उत्पत्ती आणि लयाच्या चक्राचे, तसेच मानवी जीवनातील अनित्यतेचे दर्शन घडवते. सिंदूर खेलाच्या माध्यमातून महिलांमध्ये परस्पर सौहार्द आणि आदराची देवाण-घेवाण होते.
दस-याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आदिशक्तीची उपासना आणि गुणत्रयांचे संतुलन. नऊ दिवसांच्या नवरात्रात तम, रज आणि सत्त्व या त्रिगुणांचे टप्पे ओलांडून जेव्हा साधक दहाव्या दिवशी पोहोचतो तेव्हा ती अवस्था विकारांवर मिळवलेल्या विजयाची असते. दुर्गेचे रौद्र रुप, लक्ष्मीचे समृद्धी देणारे रुप आणि सरस्वतीचे ज्ञानमय रुप या तिन्हींची आराधना झाल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी आत्मिक विजयाची अनुभूती घेतली जाते. देह, मन, निसर्ग, जल, वायू आणि अन्न या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून जीवन जगण्याची शिकवण ही परंपरा मौलिक आहे. मानवी जीवन समृद्ध करणा-या प्रत्येक घटकाविषयी आदर बाळगणे हाच या उत्सवाचा खरा गाभा आहे.
दक्षिण भारतात दस-याचे रुप वेगळ्याच वैभवाने नटलेले दिसते.
म्हैसूरचा ऐतिहासिक दसरा जगप्रसिद्ध आहे. अंबा विलास राजवाड्यावर होणारी नयनरम्य रोषणाई, चामुंडेश्वरी देवीची हत्तीवरून निघणारी सुवर्ण अंबारीतील मिरवणूक आणि पारंपरिक कलाप्रकारांचे सादरीकरण यामुळे दस-याच्या दिवशी हा परिसर ऐतिहासिक वारशाने उजळून निघतो. याच दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुध पूजा केली जाते. शेतीची अवजारे, कारागिरांची हत्यारे, वाहने, आधुनिक यंत्रसामुग्री आणि पुस्तके यांची विधिवत पूजा केली जाते. ज्या साधनांच्या सहायाने मनुष्य आपली उपजीविका चालवतो, स्वत:चे आणि समाजाचे भरण पोषण करतो त्या साधनांना देवत्व बहाल करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भारतीय परंपरा जगाला अनुसरणीय आहे. तंत्रज्ञानाच्या या युगातही श्रमाला आणि साधनांना पूजनीय मानण्याची ही दृष्टी अद्वितीय ठरते. दस-याच्या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून एकमेकांना वाटण्याची परंपराही समाजशीलता जपणारी आहे. ‘सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हणत आपट्याचे पान देऊन परस्परातील कटुता, मत्सर आणि दुरावा विसरून प्रेम, सद्भावना आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. वैरत्व आणि आत्मकेंद्रीपणा वाढत चाललेल्या जगात स्नेहभाव जपणारा दसरा विशेष महत्त्वाचा ठरतो.
या दिवशी घराघरांच्या दारांवर झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरणे डोलताना दिसतात. झेंडू समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक बनून प्रत्येक उंबरठ्यावर स्वागतशील भाव निर्माण करतो. कुल्लूचा आंतरराष्ट्रीय दसरा, छत्तीसगडमधील बस्तरचा पारंपरिक आदिवासी दसरा, उत्तर भारतातील भव्य मेळे आणि महाराष्ट्रातील सीमोल्लंघनाचा उत्साह या सर्वांमधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडते. प्रदेशानुसार रितीरिवाज, खाद्यसंस्कृती आणि पूजेच्या पद्धती बदलत असल्या तरी अंत:प्रवाह मात्र एकच राहतो तो म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन आणि सत्प्रवृत्तींचा सन्मान. विजयादशमी ही विशिष्ट पंथापुरती किंवा समूहापुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला एकत्र जोडणारा, सामाजिक बंध घट्ट करणारा आणि सामूहिक आनंदाची अनुभूती देणारा लोकोत्सव बनला आहे.आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात विजयादशमीचे महत्त्व अधिकच प्रस्तुत ठरते. आज युद्धे कदाचित रणांगणावर लढली जात नसतील तरी मानवी मनात आणि सामाजिक पटलावर विचारांचे, स्वार्थाचे आणि संकुचिततेचे संघर्ष सतत सुरू असतात. स्वत:मधील दुर्गुण, आळस, निराशा आणि अन्यायाची वृत्ती या रावणांचे दहन करून ज्ञानाची, श्रमाची आणि मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हेच खरे आधुनिक सीमोल्लंघन आहे. नवे उद्योग, नवीन संकल्प, शिक्षणाचा श्रीगणेशा आणि नवविचारांची पेरणी करण्यासाठी दसरा हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो त्या मागे हीच प्रेरणा आहे.
– पं. विजयशास्री जोशी
















