मुंबई : प्रतिनिधी
महागाईच्या झळा सहन करणा-या सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. डिझेल, साखर आणि पॅकिंग साहित्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे नवे सुधारित दर येत्या मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार असून केवळ दूधच नव्हे, तर दही, ताक, पनीर, तूप यांसारख्या विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही तब्बल १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी डेअ-यांची शिखर संस्था असलेल्या ‘दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची’ एक महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे झालेल्या या बैठकीत सुमारे २० प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी दूध संकलन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतुकीवर होणा-या वाढत्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डिझेलच्या दरात लिटरमागे १० रुपये, साखरेच्या दरात किलोमागे १२ रुपये आणि पॅकिंग साहित्यात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने दूध व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हा वाढता उत्पादन खर्च भागवण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी ही दरवाढ अनिवार्य असल्याचे संघाने स्पष्ट केले.
















