लातूर : प्रतिनिधी
भारत सरकारने नव्याने केलेल्या विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण) (व्हीबीजी-राम-जी) अधिनियम-२०२५ राज्यात १ जुलैपासून लागू झाला आहे. त्यानुसार विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) जिल्ह्यात राबविण्यास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या उपस्थितीत घरकुल, सिंचन विहीर कामाचे ई-मस्टर काढून अंमलबजावणीला सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, कृषी व पशुसंवर्धन सभपती कविता गोरे, महिला व बालकल्याण सभपती शिवकन्या गोडभरले, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव, गट विकास अधिकारी संतोष माने यावेळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) विषयक घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
नागरिकांचे ग्रामीण भागातील स्थलांतरण थांबविणे आणि त्यांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेतून ग्रामीण भागात जलसुरक्षा व जलसंधारणाची कामे, मूलभूत ग्रामीण पायभूत सुविधा, उपजीविका आधारित पायभूत सुविधा आणि आपत्ती प्रतिबंधक कामांवर या योजनेत भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात सुविधा निर्मितीला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारी ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना म्हणाले. उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आशिष पावले यांनी योजनेबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, तर संतोष माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















