नवी मुंबईत ११ कंपन्यांवर कारवाई
नवी मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने भेसळयुक्त पदार्थ आणि अस्वच्छतेसह खाद्यपदार्थांसदर्भातील मानांकन न पाळणा-यांवर कारवाई करीत आहे. त्यातूनच अनेक हॉटेल्स आणि दुकानांना सील ठोकण्यात आले. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका अनेकांनी घेतला. त्यातच आता नवी मुंबईत विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट, बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेटमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून त्याच खाद्यपदार्थांची विक्री आणि निर्यात केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ११ निर्यातदार कंपन्यांविरुद्ध कारवाई केली.
नवी मुंबई गुन्हे शाखेने तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांच्या मूळ पॅकेटवरील उत्पादन आणि एक्सपायरीची माहिती तपासण्यात आली असता जुन्या तारखा बदलून पॅकेटवर नव्या तारखा छापण्यासाठी डेट प्रिंटिंग मशीनचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना सोबत घेऊन अशा कारखान्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली.
पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईत तुर्भे पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान तारखा छापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, विविध नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण ७५ लाख २१ हजार २६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात जयप्रकाश संचतीराम सिंग, (२७ वर्षे) आणि जया नवरंग बहादूर सिंग, (२६ वर्ष) तसेच संबंधित ११ निर्यातदार कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
११ निर्यातदारांनी
बदलले लेबल
६ दिवसांत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १८ निर्यातदारांचा सुमारे २ कोटी ४६ लाख ५३ हजार ३५४ रुपयांचा माल तपासण्यात आला. त्यापैकी ११ निर्यातदारांच्या सुमारे ७५ लाख २१ हजार २६९ रुपयांच्या मालावरील लेबल आणि पॅकेटवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी/बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर आणि एमआरपीमध्ये बदल केल्याचे समोर आले.
















