26.4 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeसंपादकीय विशेषजागतिक सिनेमांची खिडकी

जागतिक सिनेमांची खिडकी

नुकताच लातुरात दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. महाराष्ट्र शासन, पुणे फिल्म फाऊंडेशन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, लातूर आणि अभिजात फिल्म सोसायटी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट महोत्सव घेण्यात आला. यावेळी एकूण पंचवीस चित्रपट चार दिवसांच्या काळात दाखवण्यात आले. मागच्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वरील सर्वांच्या सौजन्याने पार पडला. तत्पूर्वी मानसरंग चित्रपट महोत्सव व लातूर फेस्टिव्हल अंतर्गत अभिजात फिल्म सोसायटीतर्फे काही सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येत असे. पण २०१६ च्या भीषण दुष्काळामुळे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला. त्यानंतर मानसरंग व मागच्या वर्षीचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला.

सोबतच लातुरात पहिली फिल्म सोसायटी स्थापन केली ती सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक, लेखक अतुल देऊळगावकर यांनी. ‘संवाद’ या नावाने. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील आशयघन सिनेमे बघण्याची सोय यात झाली. नव्वदच्या दशकात सुरुवातीची काही वर्षे तिचे काम नेटाने चालू होते. नंतर ती बंद झाली. पुढे जवळपास दशकभर सोसायटीचे काम झाले नाही. २००३ च्या ‘दहावी फ’ ने ‘अभिजात फिल्म सोसायटी’ची स्थापना झाली. देऊळगावकरांनी बीज रोवलेल्या फिल्म सोसायटीच्या रोपट्याचा अभिजात फिल्म सोसायटीने वृक्ष बनवण्याचा चंग बांधला. पण २००६ नंतर सोसायटीला ओहोटी लागली. २०१८ मध्ये पूर्वीच्या काही सदस्यांना व नवीन सिने रसिकांना घेऊन ‘अभिजात फिल्म सोसायटी’ चे पुनरुज्जीवन करण्यात आल्े. फिल्म सोसायटी सुरू होण्याचा मोठा फायदा या काळात लातूरकरांना झाला. जागतिक सिनेमा जरी बघण्यात येत नव्हता तरी आशयघन सिनेमे दाखवण्याकडे यांचा कल राहिला. त्यामुळे संख्येने कमी प्रमाणात असले तरी लातुरात या सिनेमांना प्रेक्षकवर्ग आहे हेच यातून दिसून आले. त्यामुळे याचं एक पुढचं पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात आला.

अशा महोत्सवांमुळे नेपाळ, भूतान, स्वीडन, जर्मनी अथवा अन्य देशांत कोणत्या प्रकारचे सिनेमे बनवले जातात, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक समस्या काय आहेत, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात त्यांच्या देशात, समाजात काय चाललंय याचे दर्शन घडते. सिनेमाचा एक उद्देश व्यावसायिकरीत्या मनोरंजन करणे असेल तर दुसरा उद्देश कलात्मकरीत्या जगण्याचं चित्रण करून प्रश्न उपस्थित करणे हा पण आहे. या पार्श्वभूमीवर लातुरात आशयघन चित्रपट दाखवले तर प्रेक्षक आवर्जून उपस्थित होतो हे मानसरंग चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले होते. त्याला आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जोड मिळाली आहे. जब्बार पटेल यांनी उद्घाटनाच्या भाषणात हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचाच एक्स्टेंडेड महोत्सव आहे. इथल्या प्रेक्षकांनी सबटायटल्ससहित सिनेमे बघण्याची सवय लावून घ्यावी असे सांगितले. सोबतच विलासराव देशमुखांच्या कला रसिकतेचा वारसा चालवणारे लातूर शहराचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकाराने हा महोत्सव घेण्यात आला. मागच्या वर्षी १६ चित्रपट दाखवण्यात आले. यावर्षी २५ तर पुढील वर्षी आठ दिवसांचा महोत्सव आणि ७५ चित्रपट दाखवण्यात येतील असे ठरलेय. सोबतच मराठीतील पदार्पणातील लक्षवेधी अभिनेता व अभिनेत्री आणि हिंदीतील ज्येष्ठ अभिनेता-अभिनेत्रींचा गौरव करण्यात यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील होतकरू, उदयोन्मुख दिग्दर्शकांच्या लघुपटांची स्पर्धा घेऊन त्यांना याद्वारे व्यासपीठ देण्यात यावे जेणेकरून भविष्यात त्यातून उत्तम दिग्दर्शक उदयास यावेत अशी कल्पना देशमुख यांनी मांडली.

महोत्सवात मागच्या वर्षी नियोजनात काही त्रुटी राहिल्या होत्या. त्याविषयी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर्षी त्यावर ब-याच अंशी मात करण्यात आली. त्यामुळे महोत्सव सुरळीतपणे पार पडला. तरी पण कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना सिनेमा कसा पाहावा हे पुरते समजलेले नसल्यामुळे यावर्षी त्यांच्या हुल्लडबाजीला आयोजकांना सामोरे जावे लागले. पण जसजसे महोत्सवाचे वातावरण तयार होईल तसतसे प्रेक्षक सुद्धा अशा ठिकाणी कसे वागावे हे शिकतील. एका अनुभवी मराठी दिग्दर्शकाने नुकतंच वक्तव्य केलंय की ‘बास झाले आशयघन सिनेमे!’ त्यांच्या वक्तव्याला छेद देण्यासाठीच जणू या महोत्सवाचा हायलाईट असणारा जयंत सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ सिनेमा बघण्यात आला. आशयघन सिनेमा का असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून याकडे बघता येईल. लग्नासाठी मुलगी बघणे हा नेहमीचा कार्यक्रम पण एका मुलीच्या दृष्टिकोनातून त्याला काय महत्त्व आहे. तसेच तिला व तिच्या कुटुंबीयांना कोणत्या दिव्यातून जावे लागते. आपल्या समाजात लग्नसंस्था कशा पद्धतीने काम करते याचं मनोज्ञ चित्रण यात केले आहे.

याव्यतिरिक्त मी बघितलेल्या सिनेमांमध्ये ‘ब्लागाज लेसन्स’ (जर्मन), ‘द पाथ ऑफ एक्सलन्स’ (फ्रान्स), ‘अ रोड टू अ व्हिलेज’ (नेपाळ) व ‘व्हाईट प्लास्टिक स्काय’ (हंगेरी) वैशिष्ट्यपूर्ण होते. पैकी नेपाळचा ‘अ रोड टू अ व्हिलेज’ एक गरीब कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी किती हालअपेष्टा सहन करते याचं चित्रण करतो. नेपाळ जरी आपला शेजारी देश असला तरी त्याविषयी फक्त एव्हरेस्ट, काठमांडू इतपतच माहिती असणा-या आपल्याला या देशात एका कुटुंबाला कसं जगावं लागतं याचं वास्तववादी दर्शन घडवतो. तर हंगेरीचा ‘व्हाईट प्लास्टिक स्काय’ हा रोटोस्कोपिक तंत्रज्ञानाने बनवलेला अ‍ॅनिमेशनपट भविष्यातील डिस्टोपियन हंगेरी दाखवतो. त्यासाठी साय-फाय सेटअपचा वापर करतो. एक गोष्ट त्याला इतर साय-फायपेक्षा वेगळे करते ती म्हणजे त्याचा कथानकातला ठेहरावचा वापर, मिनिमलिस्ट अप्रोच व तीन प्रमुख पात्रांची तात्विक चर्चा. सिनेमा काहींना कंटाळवाणा वाटू शकतो जर हॉलिवूड स्टाईल घटनांनी खच्चून भरलेलं डिस्टोपियन फ्युचर बघण्याची सवय असेल तर. पण निव्वळ कोरी पाटी मनात ठेवून बघितला तर आवडू शकेल. असे सिनेमे बघायला मिळणे हेच अशा महोत्सवांचं महत्त्व असतं. इतर वेळी आपल्याला हे सिनेमे बघायला मिळतील याची खात्री नसते.

-विवेक कुलकर्णी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR