लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर, भंडारा – गोंदिया व रामटेक या पाच मतदारसंघात १९ एप्रिलला निवडणूक होणार आहे. तेथे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, बुधवार, २७ तारखेपर्यंत ही मुदत आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी व महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ संपलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना यश येणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही.
जे आधीपासून एकत्र आहेत, त्यांच्यातही सर्व आलबेल आहे असे नाही. तीन वर्ष सत्तेत एकत्र राहिलेल्या महाविकास आघाडीत व सत्तेसाठी एकत्र आलेल्या महायुतीतही एकेका जागेसाठी घमासान सुरू आहे. संख्याबळ कमी असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्याच्या सत्तेत बरोबरीचे स्थान दिल्यामुळे ते आपण सांगू त्या जागावाटपावर तयार होतील, असे भाजपाला वाटत असावे. या दोन्ही पक्षांना एक अंकी जागा देऊन, स्वत: ३३ ते ३५ जागा लढवण्याचा भाजपाचा विचार होता. उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे यांच्यासोबत आलेल्या १३ विद्यमान खासदारांच्या जागा तरी त्यांना मिळणार की नाही, अशी स्थिती होती. पण शिंदे, अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतल्याने भाजपाचा दोन तृतीयांश जागा लढवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. फोडाफोडीचे राजकारण करून जमा केलेल्या गर्दीमुळे शक्ती वाढण्याऐवजी त्यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांत महाराष्ट्रात राजकारणाचा पार चिखल झाला आहे. त्यामुळे यंदाची धुळवडही जोरात आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फोडून, बहुसंख्य आमदार, खासदार बरोबर आले तरी महाराष्ट्रातील यशाबद्दल खात्री वाटत नाही. त्यामुळे आणखी मित्र जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांना पक्षात आणल्यावर राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मागच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावले होते. या दोघांत तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे मनसे महायुतीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश खासदार, आमदार शिंदेंसोबत असले तरी सामान्य शिवसैनिक व शिवसेनेचा परंपरागत मतदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्याच सोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रूपाने एक ठाकरे आपल्या सोबत आले तर त्याचा फायदा होईल. गर्दी खेचण्याची क्षमता असणारा वक्ता उपलब्ध होईल, असे त्यांना वाटत असावे. पण अमित शहा व राज ठाकरे यांच्या भेटीला आठवडा होत आला तरी अजून युतीची घोषणा होऊ शकलेली नाही. याचे कारण म्हणजे मनसेला लोकसभेचे दक्षिण मुंबई व नाशिक हे दोन मतदारसंघ हवे आहेत व एकनाथ शिंदे कोणत्याही स्थितीत नाशिक सोडायला तयार नाहीत. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मागच्या आठवड्यात तेच यावेळीही उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज एका पंचतारांकित हॉटेलात प्रदीर्घ चर्चा झाली. बुधवारी मध्यरात्री देखील फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक पार पडली. ‘अशा भेटी होतच असतात’, असे सांगत फडणवीस यांनी अधिक बोलायचे टाळले. पण मनसेला नाशिकची जागा सोडण्यास शिंदे तयार नसल्याने कोंडी झाल्याची कुजबुज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. पण त्यानंतरही महायुतीतला जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर येणा-या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना त्यांच्याकडे सोपवण्याची भाजपाची रणनीती असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे संशयकल्लोळ नाट्य सुरू झाले आहे.
शिंदेंनी अंदाज चुकवला !
५० आमदारांचा पाठिंबा असतानाही ११५ आमदार असलेल्या भाजपाने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. पण सरकारवर भाजपाचाच अंकुश असेल, त्याचसाठी देवेंद्र फडणवीस यांना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्रिपद घ्यायला लावले गेल्याची चर्चा होती. परंतु गेल्या पावणेदोन वर्षात शिंदे यांनी सत्तेवर चांगली पकड घेतली आहे. भाजपने देऊ केलेल्या मूठभर जागा स्वीकारण्यास ठाम नकार दिला. विद्यमान खासदारांबरोबरच शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या आणखी चार जागांवर दावा सांगितला आहे. शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे शरद पवार यांच्या गटात आहेत. या जागेसाठी राष्ट्रवादीचा आग्रह होता. पण या मतदारसंघाचे पूर्वी प्रतिनिधित्व केलेले शिवाजीराव आढळराव शिंदे यांच्या सोबत आहेत. शिंदेंनी त्यांच्यासाठी आग्रह धरला. राष्ट्रवादीला जागा हवी असेल तर देऊ, पण उमेदवारी आढळरावांनाच द्यावी लागेल, ही अट राष्ट्रवादीला मान्य करायला लावली आहे. शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांना माघार घ्यायला लावा, नाहीतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची अडचण करू या राष्ट्रवादीच्या इशा-याची त्यांनी दखलही घेतलेली नाही.
अजित पवार यांच्यापुढे आव्हान !
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना अजित पवार यांच्या शब्दाला वजन होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर त्यांचीच ‘दादा’गिरी होती. सवता सुभा स्थापन करून भाजपासोबत गेल्यानंतर त्यांना सत्ता मिळाली, पण त्यांच्यासमोरील प्रश्न मात्र वाढत चालले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे पवार कुटुंबात फूट पडून अजित पवार एकाकी पडले आहेत. त्यांचे पूर्वीचे सगळे विरोधक जुने हिशेब चुकते करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. विजय शिवतारे यांच्या पाठोपाठ इंदापूरचे हर्षवर्धन पाटीलही विरोधात उतरले आहेत. शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधाचा फटका बसला होता. त्याची परतफेड करण्याची संधी ते सोडणार नाहीत. हर्षवर्धन पाटील भाजपात असल्याने पक्षाने आदेश दिल्यानंतर ते कदाचित शिवतारे यांच्यासारखा थेट विरोध करणार नाहीत, पण मदत करतील याची शक्यता कमीच आहे.
रणजित निंबाळकर, नवनीत राणाविरुद्ध पुन्हा सगळे एकवटले !
माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामुळे मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर नाराज झाले आहेत. मोहिते पाटील यांना भाजपात आल्यापासून काहीही मिळालेले नाही. यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण ती पूर्ण न झाल्याने त्यांनी उघडपणे विरोध केला आहे. तिकडे अमरावती मतदारसंघातून मागच्यावेळी नवनीत राणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. पण नंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर लढण्याची तयारी केली आहे. मात्र शिंदे गटातील आनंदराव अडसूळ व अजित पवार यांच्या गटाच्या संजय खोडके यांचा त्याला थेट विरोध आहे. बच्चू कडू यांनीही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. राज्य पातळीवर तीन पक्ष एकत्र आले असले तरी अनेक जिल्ह्यांत त्यांचे नेते परस्पर विरोधात उभे असल्याचे चित्र आहे. हे संघर्ष मिटवून निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाताना नेत्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे.
आघाडीतून आंबेडकर बाहेर, सांगलीवरून जुंपली !
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चर्चा सुरू होती. पण यात यश येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्याची घोषणा केली होती. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत शिवशक्ती आणि भीमशक्तीची आघाडी आता राहिलेली नाही, असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदार, खासदार सोडून गेल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष कमकुवत झाले असले तरी सक्षम नेतृत्व असल्यामुळे जागावाटपात त्यांचाच वरचष्मा आहे. त्यांच्यामागे काँग्रेसची फरफट होत असल्याबद्दल काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून नाराजी होतीच. त्यातच शिवसेनेने सांगलीची जागा आम्हीच लढवणार असल्याचे सांगत दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. हिंगोलीची जागाही आम्हीच लढवणार असल्याचे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजी आहे. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळालीच पाहिजे, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशी भूमिका काँग्रेस नेते व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी घेतली आहे. या पेचातून काँग्रेसश्रेष्ठींना तोडगा काढावा लागणार आहे.
-अभय देशपांडे