लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने उर्वरीत पेरण्यांना वेग आला असून खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्यात आहेत. जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या २५८.८ मिलीमिटर पावसाच्या बळावर ८८.४२ टक्के म्हणजेच ५ लाख १८ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. ज्या शेतक-यांनी जूनमध्ये पेरण्या केल्या होत्या. त्या पिकांची सध्या अंतरमशागत सुरू आहे. त्यामुळे पेरलेल्या पिकांच्या वाढीसाठी व जिल्ह्याच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
जिल्ह्यात जून पासून सुरू झालेल्या खरीपाच्या पेरण्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयातही पावसाअभावी पूर्ण झाल्या नाहीत. गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे उर्वरीत पेरण्यांना वेग आला आहे. जिल्हयात ५ लाख ८६ हजार ९९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित असून आज पर्यंत २५८.८ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यानुसार ५ लाख १८ हजार २३० हेक्टरवर पेरा झाला आहे. यात ४ लाख ३५ हजार ६५३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. ५९ हजार १२४ हेक्टरवर तूर, ३ हजार ६०० हेक्टरवर मूग, २ हजार ६७१ हेक्टरवर उडीद, १ हजार ३६४ हेक्टरवर ज्वारी, ४४ हेक्टरवर बाजरी, १ हजार ५३ हेक्टरवर मका, १८ हेक्टरवर साळ, सुर्यफूल १४ हेक्टरवर, ९२ हेक्टाचा भुईमूग, ३९ हेक्टरवर कारळे, तीळाची १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर कापसाची १४ हजार १ हेक्टरवर लागवड झाली आहे.
















