गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील तीन मुलींच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या तिन्ही मुलींना मण्यार जातीचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या थरारक घटनेचा प्रसंग राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सविस्तर भाष्य केले आहे. तसेच या घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिल्याचे राज्यमंत्री जायस्वाल यांनी सांगितले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये दुर्दैवी घटना घडली. त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लक्षात आले की, ज्या ठिकाणी मुली झोपत होत्या. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा होता. खिडकीच्या बाजूला विटा ठेवण्यात आल्या होत्या. त्याच दिशेने साप खोलीमध्ये शिरला. मण्यार जातीचा साप होता. जेव्हा तो दंश करतो, तेव्हा मुंगीसारखा दंश झाल्याचे जाणवते. एक नाही तर चार मुलींना सापाने दंश केला. तेव्हा सापाने दंश केल्याचे लक्षातच आले नाही. वारंवार सापाने दंश केल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि त्यावेळी विद्यार्थिनी झोपेतून उठल्या.
‘या घटनेत मुलीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. दीपिका नावाच्या मुलीला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एक मुलगी गडचिरोली येथे उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे. पीडित कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. आश्रमशाळेची पाहणी केली असता असे लक्षात आले की, नियमानुसार त्या ठिकाणी जेवण दिले जात नाही. झोपण्याची व्यवस्था योग्य नाही. कर्मचारीही त्या ठिकाणी राहत नाहीत. १४ ऑगस्टला या संदर्भात बैठक ठेवण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुलींना साप चावल्याचे कळलेच नाही : जयस्वाल
मुलींना साप चावल्याचे सुरुवातीला कळालेच नाही. सुरुवातीला डास चावल्यासारखे वाटले त्यामुळे मुली उठल्याच नाहीत. मात्र एका मुलीला वारंवार चावल्यामुळे ती झोपेतून उठली. तिने आरडा ओरडा केला, त्यानंतर समजले. वसतीगृहाची पाहणी केल्यावर कळालं व्यवस्थीत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. १४ तारखेला बैठक लावली आहे, मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
















