लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ सोडत (लॉटरी) द्वारा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. तिस-या प्रतिक्षा यादीत आज पर्यंत १२ पालकांच्या पाल्याचे प्रवेश झाले आहेत. उर्वरीत बालकांना शनिवार दि. ११ जुलै पर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.
पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानीत २०७ शाळांची नोंदणी झाली होती. या शाळेत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या २ हजार ३४३ जागा आहेत. त्यासाठी ६ हजार ६९९ पालकांनी ऑनलाईन अर्ज नोंदवले होते. त्या संदर्भाने मोफत प्रवेशाच्या सोडतीत (लॉटरी) लातूर जिल्हयातील २ हजार २६९ बालकांची निवड होऊन त्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठवले होते. त्यानुसार १ हजार ७६४ बालकांचे मोफत प्रवेश झाले. तर विविध कारनामुळे ८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले. या नंतर शासनाने प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी संधी दिली.
त्यानुसार पहिल्या प्रतिक्षा यादीसाठी ४१४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी २३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर ५ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले. दुस-या प्रतिक्षा यादीसाठी १३४ विद्यार्थ्याची निवड झाली होती. त्यापैकी ८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर ३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज समितीने रद्द केले. तर तिस-या प्रतिक्षा यादीसाठी ३९ विद्यार्थ्यांची निवड केली होती. आज पर्यंत १२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून ३ विद्यार्थ्यांचे विविध कारणामुळे तालुकास्तरीय समितीने प्रवेश रद्द केले आहेत. तर उर्वरीत प्रवेशासाठी पालकांना शनिवार दि. ९ जुलै ही शेवटची तारीख आहे.
















