लातूर : प्रतिनिधी
राज्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागा अंतर्गत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही अनेक दिव्यांग प्रवाहाच्या बाहेर आहेत. या क्षेत्रात सेवाभाव वृत्तीने कार्य केल्यास दिव्यांगांना आपलेसे वाटणार आहे. त्यामुळे सेवाभाव वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजीत बडे यांनी केले.
दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, लातूर व श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बोरी संचलित संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाच्या सभागृहात लातूर जिल्हयातील विशेष शाळा/कार्यशाळा/मतिमंद बालगृह यांच्या मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक यांची आढावा बैठक रविवारी संपन्न झाली. यावेळी पुणे येथील दिव्यांग आयुक्तालयातील लेखाधिकारी अनिल हगवणे, निरीक्षक भारत कांबळे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जि.प. लातूरचे संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजु गायकवाड, सहाय्य्क सल्लगार बाळासाहेब वाकडे, संस्थेचे अध्यक्ष अण्ण्णासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आयुक्त बडे म्हणाले ‘दिव्यांग क्षेत्रातील शिक्षक कर्मचा-यांच्या समायोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासह मतिमंद प्रवर्गातील दिव्यांगाचे प्रमाणही वाढत आहे. यावरही उपाययोजना आवश्यक आहे.’
प्रास्ताविकात संस्था अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देत अनाथ मुलांच्या आधार कार्ड काढण्यासाठी येत असलेल्या अडचणीही सांगितल्या. लेखाधिकारी अनिल हगवणे यांनी दिव्यांग शाळांतील कर्मचा-यांच्या विविध अडचणी मांडत वेतनश्रेणीच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांकडे विशेष मागणी केली. निरीक्षक भारत कांबळे यांनी जिल्हयातील मुख्याध्यापकांच्या विविध समस्येचा आढावा घेतला यावर आयुक्त सत्यजीत बडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनेक सुचनाही केल्या. तत्पुर्वी आयुक्तांनी विद्यालयातील डिजीटल क्लासरूम, बेड रिटन मुलांची चौकशी व त्यांना असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत संस्थेचे कौतुक केले. यासह बालगृहातील व्यवसायिक वस्तु, ऑफीस फाईल, क्रीडारूम व जिमचीही पाहणी केली. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या आढावा बैठकीस जिल्हयातील ५५ मुख्याध्यापक, व्यवस्थापकीय अधिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन वाघ यांनी केले. तर आभार प्रदर्शन हर्षराज शेंद्रे यांनी केले.
















