पुणे : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजीनगर येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने टीका होत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आले. त्यावर सर्वच स्तरांतून रोष व्यक्त केला जात आहे.
मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजीनगर परिसरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले पाहिजे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील अनेक फोटो आणि व्हीडीओ समोर आले आहेत. या हत्याकांडातील फोटो आणि व्हीडीओ या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिले नसतील का, असा सवाल आडेकर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे फोटो पाहिले असतील, तर मग ते इतके दिवस गप्प का होते, असा प्रश्नही आडेकर यांनी विचारला.