मुंबई : प्रतिनिधी
वगेल्या नऊ वर्षात देशातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. मात्र, संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल केला नाही. शिवाय संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण न्यायालयात न नेता मध्येच लटकावून ठेवले जात आहे. धाडी टाकून भ्रष्टाचाराची प्रकरणे लटकवून ठेवण्यात राजकारण असून, यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.
संविधान सन्मान महासभेत ते बोलत होते. भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडताना त्यांनी आता हळूहळू जशी सत्ता जात आहे, तसा यांचा कार्यक्रमही बदलत आहे. सगळ््याच गोष्टींचा वापर केला जात आहे. आज सकाळपासून किती धाडी पडल्या, ते मी बघत होतो. माझ्या माहितीप्रमाणे आज देशभरात सात ठिकाणी धाडी पडल्या. मग गेल्या नऊ वर्षात किती ठिकाणी धाडी पडल्या, याचा विचार करा. ज्यांच्यावर धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली. पण त्यांना न्यायालयात उभे केले नाही. त्यांना लटकावत ठेवले आहे. हे लटकावत ठेवण्याचे जे राजकारण आहे, त्यांना देशात भीती निर्माण करायची आहे, अशा शब्दांत जोरदार टीकास्त्र सोडले.
तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही छापेमारी करू आणि तुम्हाला तुरुंगात पाठवू, अशा धमक्या देऊन येथील व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ख-या अर्थाने आपण विचार केला तर आपण या देशाचे मालक आहोत आणि ज्याला निवडून दिले आहे, तो आपला नोकर आहे. एवढे लक्षात ठेवा. पण दुर्दैवाने मालकाने आपले मालकपण सोडले आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
उद्या आपण केंद्र सरकारला विचारले पाहिजे, तुम्ही ज्यांच्यावर आतापर्यंत धाडी टाकल्या, त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत. त्यांना न्यायालयात उभे केले असते तर तो आरोपी आहे किंवा नाही, हे न्यायालयाने सांगितले असते. पण संबंधितांना न्यायालयात घेऊन जायचे नाही. असे राजकारण संविधानाला धरून नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
३ डिसेंबरनंतर कुठे ना कुठे दंगल
सध्यात देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवले जात आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातले जात आहे. २००४ मध्ये गोधरा हत्याकांड घडले, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आरक्षणाच्या नावाखाली
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगतानाच ओबीसी आरक्षण ओबीसी नेत्यांनी नाही, आम्ही मिळवून दिल्याचा दावा केला.