नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुस-या दिवशी महिला एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये भारताने विजयाने सुरुवात केली. बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या सामन्यावर भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणा-या या भारतीय सुपरस्टार खेळाडूचा यावेळी तिसरे पदक जिंकून इतिहास रचण्याचा मानस आहे. पी. व्ही. सिंधूने महिला एकेरी गटातील आज खेळला गेलेल्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमथ नब्बा अब्दुल रझाकविरुद्ध दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
सिंधूने पहिला गेम २१-९ असा जिंकला तर दुसरा गेम २१-६ ने जिंकला. सिंधूने अवघ्या २७ मिनिटांतच हा सामना संपवला. भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी मानला जात होता आणि तसे झाले.
पी. व्ही. सिंधूने पहिला गुण मिळवून सामन्याला सुरुवात केली. यानंतर तिने हळूहळू आपल्या गुणामध्ये वाढ केली. पी. व्ही. सिंधूने मालदीवच्या फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाकविरुद्धचा पहिला सामना सहज जिंकला. पहिला गेम अवघ्या १३ मिनिटांत २१-९ असा जिंकला तर दुसरा गेम १४ मिनिटांत संपला. पी. व्ही. सिंधूने दुसरा गेम २१-६ असा जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. भारतीय स्टारने दोन्ही गेम अवघ्या २७ मिनिटांत जिंकून शानदार सुरुवात केली.