निलंगा : प्रतिनिधी
शेतक-यांना शेतीपर्यंत सुलभ व कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणा-या बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीस गती देण्याच्या उद्देशाने निलंगा पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
बैठकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यांतील योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करून अंतिम याद्या तयार कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी विविध अधिका-यांनी उपस्थित केलेल्या शंका व तांत्रिक अडचणींचे निरसन करण्यात आले. क्षेत्र मोजणी, अतिक्रमण, रस्त्यांच्या प्राधान्यक्रमासह विविध कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. प्रशासनाच्या समन्वयातून योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. योजनेअंतर्गत गावनिहाय शेतरस्त्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती तातडीने प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित भागातील शेतरस्ते, उपलब्ध क्षेत्र, अतिक्रमणाची स्थिती व प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून अचूक माहिती सादर करण्यावर भर देण्यात आला.
तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित गटविकास अधिका-यांकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर तहसीलदारांच्या स्वाक्षरीनंतर त्या अंतिम करून उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील गावनिहाय प्रस्तावित शेतरस्त्यांच्या याद्या उपविभागीय अधिका-यांकडे सुपूर्द केल्या. प्राप्त याद्यांची तपासणी करून विहित नमुन्यात अंतिम माहिती तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
















