शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात गुरूवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. यात फळबागांचे मोठे नुकसान झाले. तर उन्हाळी पिकांसह भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसला असून आनंदवाडी येथील रामा परले यांच्या बैलावर विज पडल्याने बैल जागीच ठार असून ऐन पेरणीपूर्व मशागतीत ही दुर्घटना घडल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पावसाने कडक उन्हात थोडासा दिलासा मिळाला असला तरी या वादळी पावसाने आंबा,भाजीपाला व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा भाजीपाल्या ला फटका बसल्याने भाजीपाल्याचे भाव आता गगनाला भिडणार आहेत. तर आंबा पिकाला पावसाचा मार लागल्याने आंबा पिकाची प्रतवारी खराब होऊन बागायतदार शेतक-यांना आर्थिक फटका बसणार आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वा-यासह झालेल्या पावसात विज गायब झाली होती.गुरुवारी दुपारी अचानक आकाशात काळे ढग जमले व विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु झाला. या वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याने नागरिकांना या वादळी वा-याचा फटका बसला.
दरम्यान तालुक्यातील आनंदवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रभु रामा परले यांनी आपली बैलजोडी शेतात बांधली होती. अचानक विजेच्या कडाकडाटासह आलेल्या वादळी पावसात विज पडल्याने त्यांच्या बैलजोडीतील एक बैल जाग्यावर ठार झाला आहे.मोठ्या कष्टाने बैल बारदाना उभा केला व पेरणीपूर्व मशागत सुरू असताना विज पडून सुमारे ६० हजारांचा बैल दगावल्याने शेतकरी उघड्यावर आला असून प्रशानाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आपदग्रस्त शेतकरी प्रभु रामा परले यांनी केली आहे.