पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेली अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने विरोध करणा-या शेतक-यांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. शेतक-यांनी ड्रोन सर्व्हेसाठी आलेल्या अधिका-यांना काम करू दिले नाही. बैलगाडी अंगावर येण्याचे निमित्त करत पोलिसांनी लाठीहल्ला करून अनेक शेतक-यांना जखमी केले, शेतक-यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू होती.
विमानतळ प्रकल्पबाधित एखतपूर गावात प्रशासनाने शुक्रवारी ड्रोनद्वारे सर्व्हेस प्रारंभ केला होता. मात्र, शेतक-यांनी दिवसभर रस्त्यावर बसून आंदोलन करीत प्रयत्न हाणून पाडला. दुस-या दिवशी शनिवारी पुन्हा उर्वरित गावांचा सर्व्हे होत असल्याचे दिसल्यावर शेतक-यांनी प्रकल्पबाधित सर्व गावांच्या सीमा बंद करून पोलिसांची नाकाबंदी केली होती.
पोलिस ठाण्यात शेतक-यांचा ठिय्या
पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून अनेक शेतक-यांना जखमी केले. त्याचवेळी काही शेतक-यांची धरपकड सुरू केली. आंदोलनातील आठ, दहा जणांना धरून पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यामुळे सर्व शेतक-यांनी सायंकाळी पाच वाजता सासवड येथे येऊन पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. शेतक-यांवर गुन्हे दाखल करू नका, तसेच त्यांना तातडीने सोडून द्या, अशी मागणी करून जोपर्यंत शेतक-यांना सोडणार नाही तोपर्यंत आम्ही पोलिस स्टेशनमधून मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली.
सर्वेक्षण स्थगित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचे आजचे सर्वेक्षणाचे कामकाज स्थगित करण्याचे आदेश दिले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्याला विमानतळाची गरज आहे. हा प्रश्न सामोपचाराने सोडवणार असून, पुण्याच्या जवळ जिथे कुठे जागा असेल तेथे विमानतळ करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महिलेचा मृत्यू
आंदोलनात सहभागी झालेल्या कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे (वय ८७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला, तर एखतपूर येथील विमल बाजीराव मोरे या पोलिसांच्या झटापटीत जखमी झाल्या. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आतापर्यंत तीन शेतक-यांचा मृत्यू झाला असून, आता तुम्हाला आमच्या मृतदेहावरूनच विमानतळ प्रकल्प करावा लागेल, असे म्हणून सरकारविरोधात शेतक-यांनी घोषणाबाजी केली.