ओडिशा : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
ओडिशाच्या पुरी येथील गुंडीचा मंदिरासमोर रविवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने स्थानिक पोलिस दाखल झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बसंती साहू (३६), प्रेम कांती महंती (७८) आणि प्रभात दास अशी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा, रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. मात्र, गर्दीच्या तुलनेत पुरेसा पोलिस फौजफाटा तैनात नव्हता, त्यामुळे ही घटना घडली. चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण खाली पडले आणि जमावाखाली चिरडले गेले.
भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ आधीच श्रद्धाबली (अंतिम बिंदू) येथे पोहोचले होते. नंतर, भगवान जगन्नाथाचा रथ गुंडीचा मंदिरात त्यांच्या मावशीच्या घरी पोहोचला. दरम्यान, शुक्रवार, २७ जून रोजी देवी सुभद्राच्या रथाभोवती गर्दी वाढल्याने ६२५ भाविकांची प्रकृती खालावली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
\\\\