लातूर : प्रतिनिधी
मोठा गाजावाजा करत शासनाने दर दोन महिन्याला दुस-या मंगळवारी पेन्शन धारकाच्या समस्याचे समाधान करण्यासाठी पेन्शन अदालत आयोजित करण्याचे शासन आदेश काढले. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर पेन्शन धारकाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर दोन महिन्यांनी पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार १४ जुलै रोजी पेन्शन अदालत पीठासन अधिका-याच्या अनुपस्थित झाली. पेन्शनधारकांच्या संतापाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.
पेन्शन अदालतीसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपमुख्यकार्यकारी अधिकारी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणे बंधनकारक असताना पेन्शन अदालतीसाठी बरेच अधिकारी व विभागप्रमुख अनुपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक पेन्शन अदालतमध्ये तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा तसेच प्रलंबित राहत आहेत. त्या प्रश्नावर थातूरमातूर उत्तर देऊन पेन्शन अदालतचा सोपस्कार पूर्ण केला जात आहे, असा आरोप करून पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनधारकाने संताप व्यक्त केला. जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतन वाढ देणे, वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे, निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करणे, पेन्शनधारकांना गट विमा व भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ देणे, पेन्शनचे प्रस्ताव मंजूर करणे, सुधारित पेन्शनचे प्रस्ताव मंजूर करणे, नव्याने पुन्हा वेतन निश्चिती केलेल्यांचे सेवा पुस्तिका पडताळणी करणे, प्रवास देयके, अंशराशीकरण व उपदानाची रक्कम वेळेत मिळणे, ही रक्कम मिळण्याच्या अगोदरच अंशराशीकरण रक्कम कपात करणे अशा अनेक प्रश्नाचा भडीमार करून पेन्शन धारकांनी अधिका-यांना धारेवर धरले.
पेन्शन अदालतीसाठी प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी प्रमोद पवार, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हिरागिर गिरी, अधीक्षक चव्हाण साहेब, सामान्य प्रशासन विभागाचे संदीप सोमवंशी, मनीषा चामे, कनिष्ठ अधिकारी बिरादार, तसेच श्रीमती मारकवाड, श्री सावनगीरकर, खोकले, विश्वजीत शृंगारे, डांगे इत्यादी उपस्थित होते. तर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस युवराज घंटे, कार्याध्यक्ष लक्ष्मण दावणकर, उपाध्यक्ष रमाकांत, जाधव डी.सी. गायकवाड,अल्लाबक्ष शेख,जनक पवार, बालासाहेब हांडे, ,जी एन बिराजदार, धोंडदेव,उकरंडे बालाजी उचेकर, हसमु शेख, दगडू शेख ,करीम बागवान बालाजी येळीकर, बालाजी शिंदे, रामकिशन सूर्यवंशी, खानापुरे सर,रवींद्र शिंदे, रामेश्वर कदम, शिरुरे, पवार, बिभीषण झेंडे, भंडारे इत्यादी अनेक पेन्शनर बहुसंख्येने उपस्थित होते.
















