लातूर : प्रतिनिधी
नांदेड परिक्षेत्रांतर्गत, लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबतच्या
तक्रारी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून, त्यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. या पथकाने सलग दुस-या दिवशी अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिर्रट नावाचा जुगार खेळणा-यांविरुद्ध कारवाई करत ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ७ जणांच्या विरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
सदर पथकाने लातूर जिल्ह्यातील अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठेत बळीराज ग्रो दुकानाचे पाठीमागे भगवान बोकारे यांचे वाडयातील बंद खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणा-यांविरुद्ध कारवाई करत, १७ हजार १०० रुपयांची रोकड, ८ मोबाईल व ४ मोटार सायकली असा ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात ७ इसमांविरुध्द कारवाई करुन, त्यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं ६८१/२०२६ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे, गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.















