रेणापूर : प्रतिनिधी
सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, महिला संरक्षणासंदर्भातील विविध कायदे, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणा-या ११२ हेल्पलाईन क्रमांकाची माहिती विद्यार्थ्यांना देत सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन करून सजग नागरिक बनावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी केले.
येथील शिवाजी महाविद्यालयात दि. ८ ऑगस्ट रोजी ‘पोलिस विद्यार्थी संवाद आणि मुलींचे आरोग्य व सुरक्षा’ या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश यादव हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता देशमुख, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, उपप्राचार्य दिपक रणदिवे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. संगीता देशमुख यांनी मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध बाबींवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सतीश यादव यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणा-या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सुरक्षितता व आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुवर्णा हालकुडे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा . सुप्रिया कांबळे यांनी तर आभार प्रा. एम. बी. जाधव यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.















