सारण: बिहारमधील छपरा येथे रविवारी उशिरा सायंकाळी एक भीषण रस्ते अपघात झाला. छपरा-मुजफ्फरपूर महामार्गावर भेल्दी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनहो टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. भरधाव वेगाने येणा-या १८ चाकी हायवा ट्रकची इलेक्ट्रिक रिक्षासोबत समोरासमोर धडक झाली आणि ट्रकने टोटोला पूर्णपणे चिरडले.
या दुर्दैवी अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमनूरमधील सुलतानगंज येथील रहिवासी फारुख मियाँ (वय ६०) आणि त्यांची सून शाहिदा खातून (वय ३५) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त फारुख मियाँ यांची १३ वर्षांची नात शाना परवीन आणि सुरेश पंडित (वय ४५) या वाटसरूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये इरशाद (इब्राहिम मियाँ यांचा मुलगा), दिलशाद अन्सारी (इलियास अन्सारी यांचा मुलगा) आणि जुनैद अन्सारी (आलमगीर अन्सारी यांचा मुलगा) यांचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी ‘मेकर कम्युनिटी हेल्थ सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख मियाँ यांच्या उपचारासाठी संपूर्ण कुटुंब टोटोने ‘गरखा’ येथे गेले होते. परत येत असताना, टोल प्लाझाजवळ ‘मेकर’च्या दिशेने येणा-या एका अनियंत्रित हायवा ट्रकची टोटोला समोरासमोर धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की टोटोचा चक्काचूर झाला आणि हायवा ट्रक ११,००० व्होल्टच्या लोखंडी वीज खांबावर जाऊन आदळला.
















