29.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeबुलढाणा जिल्ह्यातील टक्कलचे मूळ हरियाणा, पंजाबमध्ये!

बुलढाणा जिल्ह्यातील टक्कलचे मूळ हरियाणा, पंजाबमध्ये!

केसगळती । शिवालिक पर्वताच्या दगडांतील सेलेनियम गव्हात भिनला; रेशनचा गहू गावक-यांना बाधला!

बुलढाणा : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील १८ गावांमध्ये लोकांना टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचे मूळ पंजाब, हरियाणा राज्यातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी काढला आहे. यासाठी त्यांनी स्वखर्चाने शेवटच्या टोकापर्यंत शोध घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यासाठीचे उपायही त्यांनी शोधले आहेत.
ते म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील त्या गावचे सगळे गावकरी रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. रेशनमध्ये मिळणारा गहू या आजाराचे कारण ठरला. त्यामुळे बोंदगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्याकडून तिथे येणा-या गव्हाच्या पोत्यांचे फोटो, गव्हांचे सॅम्पल मागवून घेतले होते. ते गहू पंजाब, हरियाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणा-या भागातील होते हे सिद्ध झाले.
शिवालिक पर्वतरांगांतून पावसाळ्यात मोठे झरे येतात. तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे. झ-यांच्या पाण्यासोबत ते शेतीत पसरते. त्या भागात तिथल्या शेतक-यांनी तशा जमिनीला कुंपण घातले आहे. इथे पीक घेऊ नका, असेही सांगितले आहे. गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले. हे त्या पोत्यांवर छापलेल्या माहितीवरून सिद्ध झाल्याचे डॉ. बावस्कर म्हणाले.
जर जमिनीत सेलेनियमचे प्रमाण वाढलेले असेल तर जमिनी सेलेनियममुक्त करण्यासाठी जमिनीत शेणखत आणि जिप्सम टाकायला हवे. त्यासोबतच सूर्यफूल आणि तीळ हे आंतरपीक घेतले पाहिजे. तिळामध्ये सेलेनियम शोषून घेण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचाही फायदा होऊ शकतो. या भागात सरफेस वॉटर देण्याच्या दृष्टीने कालव्यातून पाणी द्यावे लागेल, हे उपाय कायमस्वरूपी करावे लागतील, असेही डॉ. बावस्कर यांचे म्हणणे आहे.
सरकारने देखील पंजाब, हरियाणाच्या भागातून येणा-या गावात सेलेनियमचे प्रमाण किती आहे हे गहू वितरण करण्याआधीच तपासावे, तसे न तपासता जर गव्हाचे वाटप, वितरण झाले तर जे बुलढाण्यात घडले ते महाराष्ट्रात कुठेही घडू शकते, अशी भीतीही डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्यात जे काही घडले त्याचा आयसीएमआरकडून लवकरच रिपोर्ट येणार आहे, असे सांगितले जात होते. मात्र, अद्यापही आयसीएमआरने यासंबंधी कसलाही खुलासा किंवा रिपोर्ट दिलेला नाही. आयसीएमआरसारखी संस्था या विषयात अजूनही गप्प बसत असेल तर लोकांनी कोणाकडे बघायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR