चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील बोथी ते बोथी तांडा रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बोथी ते बोथी तांडा हा दोन गावांना जोडणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर अनेक विद्यार्थी, व्यावसायिक व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर राहादारी आहे.
या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी शेतीतील भाजीपाला वाहनाद्वारे ने-आण करतात. याशिवाय अन्य वाहनांची वर्दळ सातत्याने येथे असते. मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर पिकअपची सतत वाहतूक असते. सदरचा रस्ता खूप जुना असून अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सदरील रस्त्याच्या संदर्भात संबंधित विभागाच्या वतीने दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.