चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील ‘समाजवाद’ चांगलाच रंगला होता. याची गंभीर दखल काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य करणे आता बंद केले आहे. तरीही आतून धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने अद्याप दावा केलेला नाही. हे बघता येथून एकच नाव समोर पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांचे निरीक्षक म्हणून काँग्रेसने नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना एक आठवड्यात सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सांगण्यात आले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांची यादीच त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी फक्त पाचच विधानसभेतील इच्छुकांच्या त्यांना मुलाखती घ्याव्या लागणार आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे अभिजीत वंजारी यांचे काम सोपे झाले आहे.
ब्रह्मपुरी येथे झालेल्या कुणबी समाजाच्या मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अल्पसंख्याक आपल्यावर राज्य करीत असल्याचे सांगून येणा-या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार असून ‘परिवर्तन’ त्यांनाच लागू होत असल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
यापूर्वीसुद्धा खासदार झाल्यानंतर धानोरकर यांनी आपण तिकिट वाटप करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर नाना पटोले यांनी खासदाराला तिकिट वाटपाचे अधिकार नसतात असे सांगून त्यांना गप्प केले होते. चंद्रपूरमधील वाद लक्षात घेता ब्रह्मपुरी मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मागणा-यांची संख्या भरपूर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागितले होते. ही प्रक्रिया पार पडली आहे. यादरम्यान ब्रह्मपुरीतून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निरीक्षक अभिजीत वंजारी यांचे या मतदारसंघातील काम हलके झाले आहे.