डीजीएमओमध्ये फोनवरून चर्चा, सीमेवर एकही गोळी सुटणार नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी ५ वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये फोनवरून संभाषण झाले. त्यानुसार पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधी जाहीर केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच सीमारेषेवर गोळीबार सुरू झाला होता. त्यावरून पु्न्हा एकदा दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीबाबत सायंकाळी ५ वाजता चर्चा झाली.
दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये फोनवरून संभाषण झाले. त्यानुसार पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेनुसार दोन्ही देशांच्या सीमारेषेवर एकाही बंदुकीतून गोळी सुटणार नाही. सीमारेषेवर आणि पुढील भागातून तात्काळ दोन्ही देशांनी आपलं सैन्य कमी करण्यासंदर्भातही या संभाषणात चर्चा झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली. त्यामुळे यापुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी कायम असणार आहे.
सीमा भागात पुन्हा
ड्रोनच्या घिरट्या!
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला असतानाही रात्री राजस्थानच्या मुनाबावजवळ आकाशात पाकिस्तानचे ड्रोन बघायला मिळाले. तसेच जम्मू-काश्मीरच्या सांबा येथे आकाशात लाल रेषा दिसल्या आणि इथे स्फोटांचाही आवाज ऐकू आल्याची माहिती आहे. दरम्यान, सांबा सेक्टरमध्ये कमी ड्रोन्स बघायला मिळाले. त्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे, असे सांगण्यात आले.