भुवनेश्वर : वृत्तसंस्था
आता सारे जग भारताचे म्हणणे ऐकते. भविष्य हे युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे (शांतता) घडणार आहे, असे आपला देश महान सांस्कृतिक वारशामुळे सा-या जगाला सांगू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. ९) सांगितले.
१८व्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, भारत हा केवळ लोकशाहीचा जनक नाही तर लोकशाही भारतीयांच्या जीवनशैलीचा घटक आहे. जगात तलवारीच्या जोरावर साम्राज्यांचा विस्तार होत असताना सम्राट अशोकाने शांततेचा मार्ग स्वीकारला होता. भारताचा हाच सांस्कृतिक वारसा आहे. भविष्य हे युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार आहे हा विचार भारत आज जगाला ठामपणे सांगत आहे. जगातील विविध देशांत भारतीय राहातात. ते त्या देशांतील भारताचे दूत आहेत, असे आमचे केंद्र सरकार मानते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकशाही हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्याला विविधता शिकवावी लागत नाही, कारण आपले जीवनच विविधतेवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय ज्या देशात राहातात तेथील समाजात ते सहज मिसळून जातात. भारतीय ज्या देशात राहातात तेथील नियम, परंपरा यांचा आदर करतात. त्या देशाच्या प्रगतीत प्रामाणिकपणे योगदान देतात.
ओडिशात आयोजिलेल्या प्रवासी भारतीय दिन संमेलनात भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि प्रवासी भारतीयांचे योगदान या विषयांवरील चार प्रदर्शनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. रामायण, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवासी भारतीयांचे योगदान, विकसित भारत घडविण्याचे ध्येय आदी विषयांची माहिती या प्रदर्शनांमध्ये देण्यात आली आहे.