16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करा

मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करा

भुजबळ यांचे पवारांना साकडे, दीड तास बंदद्वार चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
बारामतीच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका करणा-या छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. भुजबळांच्या घरवापसीसंदर्भात कुजबूज सुरू असताना आज त्यांनी अचानक पवारांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याने वेगवेगळे तर्क सुरू झाले आहेत. स्वत: भुजबळ यांनी मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासाठी भेट घेतल्याचा दावा केला. दोन समाजातील वादामुळे गावागावांत संघर्ष निर्माण होऊन स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून आपण जबाबदारी घेऊन मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करून राज्यात शांतता निर्माण करावी, अशी विनंती आपण शरद पवार यांना केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. भुजबळ यांनी रविवारी बारामतीत पक्षाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका, असा निरोप बारामतीहून आल्याचा आरोप भुजबळ यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला होता. हा आरोप करून २४ तास उलटत नाहीत, तोच छगन भुजबळ यांनी आज सकाळी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात असताना भुजबळ यांनी ही भेट पूर्वनियोजित नसली तरी या भेटीची कल्पना आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना दिल्याचे सांगितले.
मी सकाळी भेटीची वेळ न घेता अचानक शरद पवार यांना भेटण्यास गेलो होतो. ते निवासस्थानी आहेत, इतके कळल्यानंतर मी गेलो. त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते विश्रांती घेत होते. ते बिछान्यावर झोपून बोलत होते. मी कोणतेही राजकारण, पक्षीय भूमिका घेऊन अथवा आमदार किंवा मंत्री म्हणून आलेलो नाही. राज्यात तुम्ही ओबीसी आरक्षण राबविले. आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये ओबीसी जात नाहीत तर ओबीसी, धनगर, वंजारी, माळी समाजाच्या दुकानात, हॉटेलमध्ये मराठा समाजातील माणूस जात नाही. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे. आता राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, असे मी त्यांना सांगितले, असे भुजबळ म्हणाले.

पवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार
मराठा आरक्षणासाठी लढणा-या मनोज जरांगे-पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली किंवा ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणा-या नेत्यांशी मंत्र्यांनी काय चर्चा केली याची माहिती नसल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन, असे पवार यांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR