३०० कि.मी.पर्यंत रांगा, रस्ते झाले जाम, भाविकांची उपासमार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रयागराजमध्ये संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने जात आहेत. राज्यमार्गांवर वाहनांची गर्दी वाढली असून, प्रयागराज येथून मध्य प्रदेशातील कटनीपर्यंत तब्बल ३०० कि.मी. दूर भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा वाढता दबाव लक्षात घेऊन प्रयागराजच्या सीमावर्ती भागात येणा-या वाहनांना अन्य जिल्हा आणि दुस-या राज्यांकडे वाहने जाऊ देण्यास सांगितले आहे.
महामार्गालगत अनेक ठिकाणी पार्किंग स्थळ बनविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे वाहने उभी केली जात आहेत. परंतु तेथून शटल बसशिवाय दुसरे कुठलेही वाहन मिळत नाही. त्यामुळे बरेच कि.मी. अंतर पायीच कापावे लागत आहे. बांदा-चित्रकूट, मिर्जापूर, वाराणसी, लखनौ, कानपूरमार्गे प्रयागराजला येणा-या वाहनांना सकाळपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मात्र, दुपारनंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
रस्ता मार्गावर भाविकांच्या वाहनांची गर्दी झाल्याने पायी चालणा-या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाकुंभमध्ये येणा-या भाविकांची गुरुवारपासून गर्दी वाढली. या आठवड्यात भाविकांची गर्दी वाढली. त्यामुळे प्रयागराजला येणारे सर्व मार्ग जाम झाले. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. मध्य प्रदेशातील रिवा, चित्रकूट सह दिल्ली, लखनौ, बिहारमधून येणा-या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खाण्या-पिण्याच्या
अडचणी वाढल्या
प्रयागराजला जाणा-या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांची चांगलीच अडचण झाली आहे. रविवारी रात्रीपासून ते सोमवारी दुपारपर्यंत अनेक मार्गावर वाहतूक जाम झाली. त्यामुळे अन्न-पाण्याविना भाविकांचे हाल झाले. महाकुंभ मेळ््यात व्हीआयपींचा ओढा वाढल्याने महामार्गावरील वाहनांना पर्यायी मार्ग दिला. परंतु भाविकांच्या गाड्यांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.