बाभळगाव : वार्ताहर
संघर्षाच्या मातीतून फुललेले जागतिक साहित्यवैभव म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य होय, असे समर्पक शब्दांत त्यांच्या कार्याचे वर्णन करावे लागेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. मराठी विभागाच्या वतीने यावेळी ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाड.मय’ या विषयावर महाविद्यालय स्तरावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
निबंध स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ग्रंथपाल डॉ. महावीर कटके हे उपस्थित होते. ते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील वंचित घटकांचे वास्तव आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या कथा, कादंब-या, लोकनाट्ये आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार दिसून येतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून समाजातील वास्तव समजून घेण्याची दृष्टी विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. जयदेवी पवार या म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल आणि अभावग्रस्त परिस्थितीतही अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीचा दीप अखंड तेवत ठेवला. औपचारिक शिक्षणाची मर्यादा असतानाही त्यांनी आपल्या अनुभवविश्वाला साहित्यरूप देत मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ‘फकिरा’सह विविध कादंब-या, कथा आणि शाहिरी आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या साहित्यामध्ये संघर्ष, स्वाभिमान, मानवी प्रतिष्ठा आणि परिवर्तनाची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाल्याने ते आजही तितकेच समकालीन असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शितल खोत यांनी केले. सूत्रसंचलन कांबळे कविता व आभार कांबळे यश यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पांडुरंग मुंढे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. शाहूराज मुळे, क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर,डॉ. अभिजीत वादाडे, डॉ. दशरथ भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ. माधव गायकवाड, डॉ. कांतराव पोले, डॉ. सुरेश कुमार कांबळे, डॉ. अंगद कोते, डॉ. नाना जाधव, डॉ. मीनाक्षी कोंगे आणि डॉ. विवेक जाधव यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
















