नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर भावात मोठी घसरण झाली. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या बारवरील आयात शुल्क १५% वरून ६%, आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क १५.४% वरून ६% पर्यंत कमी झाले आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात घोषित केलेल्या शुल्क कपातीमुळे वर्ष २०२४ मध्ये सोन्याची मागणी ७५० टन होण्याची शक्यता आहे.
तसेच आगामी सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढणे अपेक्षित आहे. नुकत्याच संपलेल्या वर्ष २४ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी घसरून १४९.७ टन झाली आहे.
एप्रिल-जून तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी वार्षिक तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून १०६.५ टन झाली. जैन म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येतील. यामुळे तिस-या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आणि चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, २०२३ मध्ये, भारतातील सोन्याची मागणी घसरून ७४५.७ टन होती. मागणीतील ही घसरण, चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. यामागचे कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती.
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मितीसोबतच निर्यातीतही या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सोने २०२२ मध्ये ५२,०००-५३,००० रुपयांवरून २०२३ मध्ये ६५,००० रुपयांवर पोहचले (१०ग्रॅम). यंदा भाव आणखी वाढले आहेत. मात्र, अलिकडच्या आठवड्यात सोन्याचे भाव वर्षाच्या सुरुवातीच्या उच्चांकावरून घसरले आहेत.