लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार, सरकारने गदा आणू नये
मुंबई : प्रतिनिधी
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारने यावर गदा आणू नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्व नियमांचे पालन करून लोकशाही मार्गाने मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करू. सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला न्यायदेवता न्याय देईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्ही शिवरायांना मानणारे असाल तर आंदोलनात विघ्न आणू नका. आम्ही परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये, असेही जरांगे पाटील म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलन अटळ असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे यांनी लोकशाही मार्गाने मुंबईत होणा-या आंदोलनाला परवानगी द्यावी, असे म्हटले. परंतु तत्पूर्वी परवानगीशिवाय मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्याकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आता या आंदोलनाला परवानगी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आम्ही छत्रपतींना आणि हिंदूंना मानणारे आहोत गणेशोत्सवात आमच्याकडून विघ्न येणार नाही. पण छत्रपतींना मानणारे मुख्यमंत्री यांनी लक्षात घ्यावे की गणेशोत्सव हा लोक समूह एकत्र यावा आणि अन्याय अत्याचार दूर व्हावा, म्हणून सुरू झालेला आहे. मुंबईत येणा-या एकही आंदोलकांकडून विघ्न येणार नाही. पण सरकारने विघ्नाच्या भूमिकेत येऊ नये. ज्या ज्या वेळी सरकाकडून गोरगरिबांवर अन्याय होतो. सरकारकडून भविष्य उद्ध्वस्त होते. त्यावेळी न्यायालय गोरगरिबांना न्याय देते. लोकशाहीतील अधिकार सोडून आम्ही आंदोलन करणार नाही. १०० टक्के लोकशाही मार्गाने आझाद मैदानावर आंदोलन करू, असे जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शिव्या
देऊन मार्ग निघत नाही
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन मार्ग निघणार नाही. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करावी, असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. आम्ही वारंवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य केल्या. सरकारने ओबीसींप्रमाणे सर्व सवलती दिल्या. मग अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
















