जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीचे दर आगामी काळात कमी होतील असा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरला आहे. सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून काल २१ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने प्रतितोळा लाखाचा टप्पा गाठला होता. पुन्हा २२ एप्रिल रोजी सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा १५०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९९०००चा टप्पा पार करत जीएसटीसह हेच सोन्याचे दर १०२००० रुपये इतके झाले आहेत.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे चित्र आहे. जळगावात सोमवारी सोन्याच्या भावात सकाळी ६०० व संध्याकाळी पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली होती. यामुळे सोने ९७.३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. तर जीएसटीसह १ लाख २१९ रुपये प्रति तोळा झाले आहेत. तसेच, चांदीत १२०० रुपयांची वाढ होऊन, ती ९७,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
आगामी काळात सोन्याचा भाव असाच वाढत जाईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव हा २ लाखांची पातळी गाठेल, असे भाकित काही तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तसे घडल्यास लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे, सर्वसामान्यांना अवघड होईल.
आज अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायनामधील ट्रेड वॉर सोन्याच्या किमती वाढीस कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान काहीच दिवसांवर अक्षय्य तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.
मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीचे भाव प्रत्येकी ९६,५०० रुपयांवर होते. पावणे पाच वर्षांनंतर काल (२१ एप्रिल सोमवारी) सकाळी सोन्या-चांदीचे भाव एकसारखे (सोने प्रति तोळा व चांदी प्रति किलो) झाल्याचे दिसून येत होते. नागपुरातही सोने जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर (मूळ भाव ९७,५००रुपये प्रतितोळा) पोहोचले. पहिल्यांदाच चांदीपेक्षा सोन्याचे भाव जास्त झाले.
एप्रिल महिन्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल ६,१०० रुपयांची वाढ झाली. शनिवारच्या ९५,८०० रुपयांच्या तुलनेत सोने १,७०० हजारांनी वाढून ९७,५०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीही ७०० हजारांनी वाढून ९६,३०० रुपयांच्या तुलनेत भाव ९७ हजारांवर पोहोचले आहेत.
२० टक्क्यांहून अधिक परतावा
ट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असा तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला आहे. यावर्षी ग्राहकांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल
येत्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखाचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे.