लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी (वैशालीनगर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या वतीने गळीत हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता’ जाहीर झाला आहे. या कारखान्याला मिळालेला हा एकूण ४० वा पुरस्कार आहे. या यशामुळे सहकार क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक विक्रम घडला आहे.
मांजरा परिवाराचा आदर्श घेऊन विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांनी आधुनिक साखर उद्योगात दिलेल्या योगदानाचे या निमित्ताने देशभर कौतुक होत आहे. हा पुरस्कार मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, विंडसर पॅलेस, नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात सहकार आणि साखर उद्योगातील मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा पुरस्कार माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन
श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार आणि व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आणि सर्व संचालक मंडळ स्वीकारणार आहेत.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून हा कारखाना उभा राहिला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनामुळे आणि माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे हा कारखाना प्रगतिपथावर आहे. मागील हंगामात शेतक-यांना रु. ३,१७१/- प्रती मे. टन असा एफआरपीपेक्षा जास्त उच्चांकी ऊस दर दिला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारासाठी कारखान्याच्या खालील उत्कृष्ट कामगिरीची पडताळणी करण्यात आली आहे. सहकार आणि साखर उद्योगातील साखर कारखान्याच्या हंगाम २०२५-२६ मधील कामकाजाचे मूल्यमापन करून विलास कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मागील हंगामा तुलनेत साखर उता-यात ०.५ टक्के वाढ नोंदवून १२.२१ टक्के उतारा मिळवला आहे तसेच विना स्टॉपेजेस ऊस गाळप, गाळप क्षमतेचा क्षमतेचा कार्यक्षमपणे वापर, उच्चांकी साखर साखर उतारा, उच्च प्रतीचे साखर उत्पादन, इंधन वापर कमी आणि उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले, हंगामात कारखाना एकही दिवस बंद राहणार नाही याची काटेकोर काळजी घेतली आहे. शेतक-यांना उच्चांकी दर आणि एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर दिला आहे इत्यादी कारखाना कामकाजाची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी विलास साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.
कारखान्याने गेल्या गळीत हंगामात चांगले तांत्रिक नियोजन करून ६,५१,४३१.२३६ मे. टन उसाचे यशस्वी गाळप केले. यात १२.२१ टक्के सरासरी उच्च साखर उतारा मिळाला आहे आणि ७,१४,४७० क्विंटल साखर तयार झाली. याशिवाय कारखान्याने ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज तयार केली. त्यातील २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी १ लाख लिटर इथेनॉल तयार झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले आहे. भविष्यातील उसाची उपलब्धता लक्षात घेता, जास्तीत जास्त ऊस तोडणी हार्वेस्टर हणजे ऊस तोडणी यंत्राद्वारे केली जाईल. १०० टक्के यांत्रिकीकरण झाल्यावरही गाळप वेगाने आणि कार्यक्षमतेने व्हावे, यासाठी कारखान्यात आवश्यक ती आधुनिक मशिनरी बसवली जात आहे.
















