बारामती : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची पक्षाने राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरचा ‘विश्वास’ उडाला आहे. ‘विश्वास’ या शब्दावरच आता ‘विश्वास’ राहिला नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाबद्दलची खदखद त्यांनी प्रथमच व्यक्त केली आहे.
काटेवाडी हे पवारांचे मूळ गाव आहे. येथील ग्रामस्थांनी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांचा नागरी सत्कार केला. यावेळी सुनेत्रा पवारांना गुलाबी फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीबद्दल खासदार पवार म्हणाल्या, ग्रामविकासाचा पॅटर्न म्हणून काटेवाडीचे नाव राज्यात नाही तर देशात अग्रगण्य आहे. काटेवाडी गावाबद्दल आपुलकी आणि आत्मसन्मान असल्यामुळे प्रपंचाकडे दुर्लक्ष करून गेली २०-२२ वर्षे गावाच्या विकासासाठी मनापासून झोकून देऊन काम केले. काटेवाडीमध्ये आतापर्यंत २०० कोटींची विकास कामे झाली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत काटेवाडीने विश्वास दाखवला नाही, विश्वास या शब्दावरच विश्वास राहिला नाही.