पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : प्रतिनिधी
देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यासह देशभरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक, राजकीय शिक्षण क्षेत्रातील एक धुरंधर हरपल्याची भावना राज्यासह देशभरातील मान्यवरांनी व्यक्त केली. माजी मंत्री कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांचे ते वडील होत.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचविण्याचा ध्यास घेत अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. डी. वाय. पाटील यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन आणि इतर विविध शाखांमध्ये त्यांनी उभारलेली शैक्षणिक व्यवस्था आज देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र बनली आहे. शिक्षणाबरोबरच समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिक्षण, आरोग्य, राजकारण, क्रीडा, कला, संस्कृती आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील अंबप गावात झाला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य असलेले डी. वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ ते १९७२ साली पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरू केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठ-मोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते विविध राज्यांचे राज्यपाल असा त्यांचा विस्मयकारक प्रवास राहिला आहे.
खा. धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहिली. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कुटुंबाचा आधारवड
हरपला : सतेज पाटील
वडिलांच्या निधनानंतर माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, समाजसेवा आणि माणुसकीची मूल्ये जपली. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा दिवा पेटवला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदींनी
वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावरील पोस्टमधून डॉ. पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षणाचा प्रसार आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
कार्यतपस्वी नेतृत्व
काळाने हिरावून नेले
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व काळाने हिरावून नेले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
















