पाथरी : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात पोलिसांनी दि. ७ जून रोजी एका विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या कारवाई १८ गोवंश पशूधनाची सुटका करण्यात आली आहे. ही जनावरे मुर्तजा कॉलनी परिसरातील एका शेडमध्ये बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नूरमिया शहाबुद्दीन कुरेशी (वय ६८, रा. मुर्तजा कॉलनी, पाथरी) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जून रोजी सायंकाळी पोलिसांना खब-याकडून मुर्तजा कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत आणि शेडमध्ये काही गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी व पथकाने शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुर्तूजा कॉलनीत छापा टाकला. या कारवाईत १८ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी या जनावरांची तात्काळ सुटका केली. या प्रकरणी नूरमिया कुरेशी याच्या विरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयात दाद मागणार : नूरमिया कुरेशी
ही जनावरे बैलांच्या बाजारातून खरेदी केली होती. आपला उद्देश गोवंशाची कत्तल करण्याचा नव्हता. आपण केवळ चार पैसे कमवण्यासाठी आणि ती जनावरे इतर शेतक-यांना विकण्यासाठी खरेदी केली होती. आपण कोणताही अवैध व्यवसाय करत नाहीत. या संदर्भात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगत पोलिसांच्या अटकेत असलेले नूरमिया कुरेशी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
















