अहमदपूर : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेची निवडणूक होऊन नवीन नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष ,नगरसेवक यांनी कामाचा पदभार हाती घेऊन सहा महिने उलटून गेले. शहराच्या स्वच्छतेसाठी अद्यापही घनकच-याचे टेंडर काढले नसल्यामुळे शहरात सर्वत्र कच-यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी प्रभाग क्रमांक ५ मधील कचरा जमा करून भाजपा गटनेते तथा नगरसेवक अॅड. अजिक्य चामे यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर टाकून एक दिवसाचे आंदोलन केले. येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे भाजपाचे आहेत. शहरात एकूण बारा प्रभाग असून २५ नगरसेवक आहेत. या शहरात फक्त सहा घंटागाडी चालू आहेत. नगरपरिषदेच्या जवळपास सात घंटागाडी बंद अवस्थेत असल्यामुळे त्या सर्व गॅरेजला दुरुस्ती साठी लावण्यात आलेल्या आहेत. यामुळे शहरातील कचरा तसाच पडून राहत आहे.
नागरिक आपल्या घरातील केरकचरा अक्षरश: रस्त्यावर आणून टाकत आहेत. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे, दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. गेल्या सहा महिन्यापासून घनकचरा टेंडर अद्यापही काढण्यात आलेले नाही याला जबाबदार कोण असा सवाल भाजपाचे अॅड.अजिक्य चामे यांनी केला आहे. पूर्वी या शहराच्या स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी किमान ८० महिला कामगार काम करीत असल्याचे समजते. गेल्या सहा महिन्यापासून सर्व शहरासाठी फक्त दहा ते पंधरा महिला झाडण्याचे, स्वच्छतेचे काम करीत असल्याचे सांगण्यात आले. सध्या फक्त काही प्रभागांमध्ये घंटागाडी कचरा उचलण्याचे काम करीत आहेत.
प्रभाग क्रमांक ५ हा मुलांचे हॉस्टेल , ट्यूशन एरिया ,शाळा ,कॉलेजचा असून या सोबतच या प्रभागात भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. बाजार करण्यासाठी महिलांची गर्दी जास्त असते. ट्यूशनसाठी मुलींची संख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते पण सायंकाळी अनेक ठिकाणी अंधार असल्यामुळे महिलांची, मुलींची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची माहिती भाजपाचे गटनेते तथा नूतन नगरसेवक अजिंक्य चामे यांनी दिली.
















