तेहरान : वृत्तसंस्था
इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले झाल्यानंतर सगळ्या जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी आहे. इस्रायलने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी इराणमधील विविध अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले केले. इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखणं या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांचे नुकसान झाले आहेच. या हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या अणवस्त्र प्रकल्पातून रेडीएशन लीक होत असल्याचा इन्कार केला होता. पण आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सीने यूएनला दिलेली माहिती हादरवून टाकणारी आहे.
इराणच्या नतांज अण्वस्त्र प्रकल्पावर इस्रायलने हल्ला केला होता. इराणने म्हटलेलं की, हा हल्ला पृष्ठभागावर झाला. त्यातून न्यूक्लियर रेडीएशन लीक होण्याची शक्यता नाही. मात्र आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सीचे प्रमुख रॉफेल ग्रॉसी यांनी इराणने दिलेल्या खोट्या माहितीचा पदार्फाश केला. इस्रायली हल्ल्यानंतर इराणी अणूभट्टीवर बाहेरुन नाही, पण अंतर्गत रेडिएशन सुरु झाले आहे, असे रॉफेल ग्रॉसी म्हणाले.
नतांज आण्विक तळाच्या आसपास बाहेर अजूनपर्यंत हे रेडिएशन पोहोचलेले नाही. पण अंतर्गत सतत त्यामध्ये वाढ होत आहे, असे कअएअ ने म्हटले आहे. ग्रॉसी म्हणाले की, ‘आत्ताच योग्य व्यवस्था केली, काळजी घेतली तर हा धोका टाळता येऊ शकतो. त्यांनी सर्वच पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे’ इस्रायलकडून अशीच कारवाई सुरु राहिली, तर इराणवर त्याचे गंभीर परिणाम होतील.
इराणचा दावा काय?
इराणच्या अणूऊर्जा संस्थेने दावा केला की, कुठलीही गळती झालेली नाही. इराणचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी सर्वकाही ठीक असल्याचा दावा केला. लवकरच पुन्हा संचालन सुरु होईल. ग्रॉसी यांनी सांगितले की, इराणी अधिका-यांनी आण्विक प्रकल्प प्रभावित झाल्याची माहिती दिली. ग्रॉसी म्हणाले की, हा घटनाक्रम चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही देशाच्या अण्विक तळांना लक्ष्य करु नये.