21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रएकाच दिवसात सुमारे ९४ कोटींचे सोने-चांदी जप्त

एकाच दिवसात सुमारे ९४ कोटींचे सोने-चांदी जप्त

मुंबईसह नागपुरात पोलिसांची कारवाई

मुंबई/नागपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार टाळण्याकरिता निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त करण्यात येत आहे. नागपूर आणि मुंबई पोलिसांनी एकाच दिवसात सुमारे ९४ कोटींचे सोने आणि चांदी जप्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीकरिता २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी सुरू आहे. याच नाकाबंदी दरम्यान मुंबई पोलिसांनी ट्रकमधून सुमारे आठ हजार किलो चांदी जप्त केली आहे. या जप्त केलेल्या चांदीची किंमत सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक आयोगाचे पथक करत आहे. सबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली होती. तेथून जाणा-या प्रत्येक लहान-मोठ्या वाहनाची झडती घेतली जात होती. तेवढ्यात एक ट्रक कर्मचा-यांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी उपस्थित कर्मचा-यांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवला. पोलिस अधिका-यांनी ट्रकची झडती घेतलीअसता संपूर्ण ट्रक चांदीने भरलेला होता. या चांदीचे वजन केले असता एकूण वजन ८,४७६ किलो असल्याचे आढळून आले. या चांदीचा बाजारभाव अंदाजे ७९ कोटी ७८ लाख २१ हजार ९७3 रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

चांदी कुठे नेण्यात येणार होती?
मोठ्या प्रमाणात चांदी आढळून आल्याने तात्काळ ट्रकचालकाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या ट्रकचालकाने चांदी कोणाकडून आणि कोठून आणली? याचा शोध घेण्यासाठी चालकाची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही चांदी कुणाची आहे? हा ट्रकचालक चांदी कोणाला आणि कुठे पोहोचवणार होता? या सर्व बाबींची प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक आयोगाची टीम चौकशी करत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

१४ कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त
नागपुरातदेखील १४ कोटी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठासमोरील रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना ‘सिक्वेल लॉजिस्टिक्स’ या पुरवठा कंपनीची गाडी पोलिस आणि निवडणूक यंत्रणेच्या पथकाने थांबविली. तेव्हा व्हॅनमध्ये १७ किलो सोने दागिने स्वरूपात आणि ५५ किलो चांदी प्लेट्स स्वरूपात आढळली आहे. जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी हे विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डरनुसार त्यांना पुरवठ्यासाठी नेली जात होती. सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स नागपूरसह अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील सराफा व्यावसायिकांनी ऑर्डर स्वरूपात मागविण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातली कागदपत्रे, बिल सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR